आले, लसूण, मिरचीला महागाईचा ठसका; फरसबीने गाठले द्विशतक, टोमॅटोची तेजी कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 08:24 IST2023-07-04T08:24:06+5:302023-07-04T08:24:46+5:30
खराब हाेणाऱ्या भाजीपाल्याने वाढली डाेकेदुखी

आले, लसूण, मिरचीला महागाईचा ठसका; फरसबीने गाठले द्विशतक, टोमॅटोची तेजी कायम
नवी मुंबई : पाऊस सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक सातत्याने घटू लागली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. लसूण, आले, वाटाणा व फरसबी किरकोळ बाजारात दोनशेवर गेली आहे. टोमॅटोचे दरही सातत्याने वाढू लागले आहेत. याची झळ साहजिकच ग्राहकांनाही आता जाणवू लागली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ५३१ वाहनांमधून २१२० टन भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये ३ लाख ५९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. मागणीपेक्षा जवळपास ५०० टन आवक कमी होत आहे. पावसामुळे भाजीपाला खराब होत असल्यामुळेही भाव वाढत आहेत. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये फरसबी ५० ते ६० रुपये किलो दराने विकली जात होती. सोमवारी ती ७० ते ७५ रुपयांवर गेली. दोडका २५ ते ३० वरून ३० ते ३६ रुपये, टोमॅटो २५ ते ४४ वरून ४० ते ६०, लसूण ३५ ते ६५ वरून ४५ ते ७५ रुपये, हिरवी मिरची ४० ते ५० वरून ६० ते ८० रुपये झाले आहेत.
होलसेल मार्केटमध्ये खरेदी केलेल्या भाजीपाल्यामधून खराब माल काढून टाकावा लागत आहे. यामुळे किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. किरकोळ मार्केटमध्ये लसूण २०० ते २४०, फरसबी १८० ते २००, आले २०० ते २४०, वाटाणा १६० ते २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. टोमॅटोचे दरही १०० ते १२० रुपयांवर पोहचले आहेत. आवक सुरळीत होईपर्यंत मार्केटमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांदा दरामध्ये झाली सुधारणा
बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले होते. जूनमध्ये कांदा दरामध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ लागली आहे. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ९ ते १३ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर आता १० ते १५ रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा २५ ते ३० रुपये दराने विकला जात आहे.