मेहतांचे पुनर्वसन होत असताना सरनाईकांमागे ईडीचे भूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 01:51 AM2020-11-26T01:51:01+5:302020-11-26T01:52:16+5:30

योगायोग की गेम?

The ghost of ED behind Sarnaika while Mehta is being rehabilitated | मेहतांचे पुनर्वसन होत असताना सरनाईकांमागे ईडीचे भूत

मेहतांचे पुनर्वसन होत असताना सरनाईकांमागे ईडीचे भूत

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भाजपच्याच नगरसेविकेच्या फिर्यादीवरून लैंगिक अत्याचाराचा दाखल गुन्हा आणि अश्लील क्लिप व्हायरल झाल्याने राजकारण सोडल्याचे सांगणारे भाजपचे वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे भाजपने पुन्हा राजकीय पुनर्वसन चालवले असतानाच, दुसरीकडे शिवसेनेचा मीरा-भाईंदरमधील चेहरा आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. हा योगायोग की भाजपने साधलेले टायमिंग, असा प्रश्न आहेच. 
सरनाईकांनी अर्णब गोस्वामी, कंगना राणावत हिच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलीच, शिवाय मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गैरकारभाराची चौकशीही लावली. दुसरीकडे २०२२ च्या पालिका निवडणुकीत सेनेची सत्ता आणण्यासाठी मोर्चेबांधणीही चालवली आहे. एकूणच पार्श्वभूमी आणि देवेंद्र फडणवीस, तसेच रवींद्र चव्हाण यांचा मेहतांवर असलेला वरदहस्त पाहता ईडीच्या काडीमागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे शासन येऊन मंत्रीपदाला हुलकावणी मिळाल्यावरही आ. सरनाईकानी शिवसेनेची ताकद वाढवण्याचा जोरदार प्रयत्न सुरूच ठेवला. कोरोनाकाळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत पुरवली. स्वस्त दरात भाज्या वितरणापासून शाखा तेथे मोफत दवाखाना आदी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. महाविकास आघाडीचे सरकार येताच त्यांनी भाजपने अडवून ठेवलेले शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लावले. भाजपच्या पालिकेतील घोटाळ्यांची तक्रार करून शासनाकडून चौकशी लावली. यामुळे भाजपची प्रतिमा आणखी डागाळली. २०२२ च्या निवडणुकीत पालिकेतील भाजपची सत्ता आमदार गीता जैन यांच्यासोबत मिळून खेचून घेण्यासाठी आ. सरनाईकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली. शहरातील सेनेचे वाढते वर्चस्व पाहता, पालिकेतील सत्ता टिकवणे भाजपला सोपे नाही.

ठाकरे मैदानात कोरोना रुग्णालय उभारण्यावरूनही आ. सरनाईकांवर टीका झाली. मेहतांचे वादग्रस्त प्रकल्प आ. सरनाईकांच्या मतदारसंघात असूनही सरनाईकांनी त्याविरुद्ध भूमिका घेतली नाही. त्यामुळे हे एखाद-दोन अपवाद वगळता मीरा-भाईंदरमध्ये आ. सरनाईकांची प्रतिमा मेहतांच्या तुलनेत निश्चितच चांगली राहिली. सरनाईकांवर कधी मेहतांसारखे गुन्हे दाखल वा गंभीर स्वरुपाच्या तक्रारी झाल्या नाहीत. त्यामुळे डागाळलेली प्रतिमा असलेल्या मेहतांना पुन्हा जनमानसात घेऊन जाणे भाजपला तेवढे सोपे नाही. त्यातच, भाजपतीलच अनेक नगरसेवक, पदाधिकारी आदींनी मेहतांच्या वादग्रस्त चेहऱ्यावर २०२२ ची पालिका निवडणूक लढवण्यास तयार नसल्याची भूमिका घेतली आहे. परंतु, तरीही मेहतांना त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी झुकते माप भाजपने दिले आहे.

...तर ईडी अस्त्राचे होणार बूमरॅंग
मेहतांचे पुनर्वसन करताना आ. सरनाईकांवरील ईडीच्या धाडीचे टायमिंग जुळून आले आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि नरेंद्र मेहतांना मोठा फायदा जाणवत असला तरी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये ईडीची काडी भाजपवरच बूमरँग होण्याची शक्यतादेखील आहे. कारण, आ. सरनाईकांबद्दल सहानुभूतीची लाट उसळल्यास भाजप व मेहतांना चांगलाच फटका बसू शकतो.

मेहतांकडून पक्षाच्या बैठका
गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मेहतांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पक्षस्तरावरही प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आ. सरनाईकांवर ईडीचा फास घट्ट आवळला जातो, की ते लवकरच यातून बाहेर पडून पुन्हा राजकीय मोर्चेबांधणीसाठी जोमाने कामाला लागतात, यावरही मीरा-भाईंदरचे गणित अवलंबून आहे.

Web Title: The ghost of ED behind Sarnaika while Mehta is being rehabilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.