Join us

गाडीला धक्का लागल्याच्या वादातून कारचालकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 08:24 IST

पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत दुचाकीचालकाचा शोध सुरू केला आहे. 

मुंबई : गाडीला धक्का लागल्याच्या वादातून घाटकोपरमध्ये एका दुचाकीचालकाने कारचालकाची हत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत दुचाकीचालकाचा शोध सुरू केला आहे. 

झिशान शेख असे मृत कारचालकाचे नाव असून, तो घाटकोपरचा रहिवासी होता. रविवारी दुपारी तो त्याच्या एका मित्रासह घाटकोपर परिसरातून कुर्त्यांच्या दिशेने जात होता. यावेळी घाटकोपर उड्डाणपूल परिसरात भरधाव वेगाने चाललेल्या गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीचालक आणि झिशान यांच्यात वाद झाला. वाद एवढा टोकाला गेला की आरोपी दुचाकीचालकाने त्याच्या गाडीच्या डिक्कीत असलेला चाकू काढून झिशान यांच्या छातीत खुपसला.

दहा पथके 

या हल्ल्यात झिशान गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. त्याच्या मित्राने यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झिशानला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पंतनगर पोलिसांनी अनोळखी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. त्याच्या अटकेसाठी दहा पथके तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस