लोकलमधून उतरा पॉड टॅक्सीत बसा; स्कायवॉकने थेट जोडणी : कुर्ला रेल्वे स्टेशनजवळील १,३७० चौरस मीटर जमीन देण्याचे निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:31 IST2025-10-04T12:31:09+5:302025-10-04T12:31:33+5:30
पॉड टॅक्सी प्रकल्प कुर्ला रेल्वे स्टेशनशी थेट स्कायवॉकच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. स्कायवॉक उभारण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला पश्चिमेतील १,३७० चौरस मीटर जमीन देण्याचे निश्चित केले आहे.

लोकलमधून उतरा पॉड टॅक्सीत बसा; स्कायवॉकने थेट जोडणी : कुर्ला रेल्वे स्टेशनजवळील १,३७० चौरस मीटर जमीन देण्याचे निश्चित
महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉड टॅक्सी प्रकल्प कुर्ला रेल्वे स्टेशनशी थेट स्कायवॉकच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. स्कायवॉक उभारण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला पश्चिमेतील १,३७० चौरस मीटर जमीन देण्याचे निश्चित केले आहे. सध्या ही जागा पार्किंगसाठी वापरण्यात येत असून, कुर्ला स्टेशनपासून १०० मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. स्कायवॉकमुळे प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात संकुलात विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्टेशनला जोडणार असल्याने येथे ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन (एआरटीएस) उभारणे आवश्यक आहे. परंतु स्टेशन परिसरात जागा नसल्याने एआरटीएस स्टेशन हे कुर्ला स्टेशनपासून २०० मीटर दूर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे ते कुर्ला स्टेशनशी स्कायवॉकद्वारे जोडले जाणार आहे. स्कायवॉकच्या लॅण्डिंगसाठी मध्य रेल्वेच्या संबंधित जागेचा वापर होऊ शकतो, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
१० टक्केजमीन (अंदाजे चार हजार चौ.मी.) रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने एमएमआरडीएला देण्यास मंजुरी दिली आहे. पॉड टॅक्सी स्टेशन हे वांद्रे रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेल्या स्कायवॉकला जोडण्याचा प्रस्ताव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवाशांना कोंडीतून दिलासा
एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे मुंबईतील काही लोकल स्टेशन स्कायवॉकद्वारे मेट्रो स्टेशनशी जोडले गेले आहेत, त्याचप्रमाणे कुर्ला आणि वांद्रे लोकल स्टेशनला पॉड टॅक्सी स्टेशनशी जोडले जाऊ शकते. सध्या कुर्ला स्टेशनपासून बीकेसीपर्यंत जाणे ही मोठी डोकेदुखी आहे. पॉड टॅक्सीमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एमएमआरडीएने हा प्रकल्प सार्वजनिक व खासगी सहकार्य (पीपीपी) मॉडेलवर करण्याचे ठरविले आहे. कुर्लाप्रमाणेच वांद्रे उपनगरीय स्टेशनजवळ एआरटीएस स्टेशन उभारणे शक्य नाही. त्यासाठी स्टेशनपासून जवळच रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाची (आरएलडीए) जमीन निश्चित करण्यात आली आहे.
पॉड टॅक्सीची सेवा अशी...
बीकेसी ते कुर्ला अंदाजे भाडे : २१ रु. (प्रति किमी.)
प्रकल्पाची लांबी : ८.८ किमी
प्रकल्पाचा अंदाजे खर्च : १,०१६.३४ कोटी रु.