Join us

मंत्रालयात जाताय? स्मार्टफोनमध्ये डीजी प्रवेश अॅप आहे ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 06:48 IST

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना दुपारी १२ पासून प्रवेश देण्यात येईल

मुंबई : मंत्रालय प्रवेशासाठी गृहविभागाने सुधारित मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणे दुपारी २ नंतर प्रवेश असेल व डीजी प्रवेश या ऑनलाइन अॅप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेतला तरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना दुपारी १२ पासून प्रवेश देण्यात येईल. दुपारी २ नंतर त्यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र लाइन असेल. मंत्रालय व विधिमंडळातील शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या ओळखपत्रावर फेसआयडीद्वारे प्रवेश आहेच. पण या व्यतिरिक्त इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास डीजी प्रवेश अॅपद्वारेच मंत्रालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. मंत्रालयात येणारे अभ्यागत तसेच वाहन प्रवेश यासंदर्भातील नवीन सुधारित मार्गदर्शक नियमावलीबाबतचा जीआर गृहविभागाने जारी केला आहे. हा निर्णय तातडीने लागूही झाला आहे.

डीजी प्रवेश अॅप हे स्मार्टफोनवरच चालते. त्यामुळे ज्या नागरिकांकडे स्मार्टफोन नाही त्यांच्या प्रवेशाचे काय हा प्रश्न मात्र कायम आहेच.

प्रमुख व्यक्तींच्या एका वाहनास पार्किंग पास

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आदी प्रमुख व्यक्तींच्या एका वाहनास मंत्रालयात पार्किंग पास देण्यात येणार आहे. वाहन ड्रॉपिंग पाससाठी देखील नियम तयार करण्यात आले आहेत. विद्यमान आमदार, खासदार यांच्याही एकाच वाहनास ड्रॉपिंग पास मिळणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या वाहनास दिव्यांग वाहन प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना आता दुपारी २ नंतर प्रवेश असेल, तर ज्येष्ठ, दिव्यांग यांना दुपारी १२ नंतर प्रवेश असणार आहे. दुपारी २ नंतर ज्येष्ठ, दिव्यांग यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र लाइन असणार आहे. सर्वसामान्यांना डीजी प्रवेश अॅप प्रणालीद्वारे प्रवेशासाठी आरएफआयडी कार्ड देण्यात येणार आहे. मंत्रालयातून बाहेर पडताना हे कार्ड जमा करावे लागेल, अन्यथा बाहेर पडता येणार नाही.

इतर सरकारी कर्मचाऱ्यांनाही डीजी प्रवेश

मंत्रालय, विधिमंडळातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मंत्रालय प्रवेश असणार आहे. विधान मंडळातील कर्मचाऱ्यांनाही फेसआयडी रेकग्निशन अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना डीजी प्रवेश अॅपद्वारेच प्रवेश घ्यावा लागणार आहे. क्षेत्रिय कार्यालयातून मंत्रालयात बैठकीला येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना बैठकीच्या एक दिवस आधी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्याचे पत्र डीजी प्रवेश अॅपवर अपलोड करावे लागणार आहे. बैठकीला संबंधित विभागाच्या फक्त दोघांनाच प्रवेश असणार आहे. 

टॅग्स :मुंबईमंत्रालय