गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:21 IST2025-05-06T07:20:55+5:302025-05-06T07:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील गायत्री पन्हाळकर हिने मराठी विषयात १०० गुण मिळवत ...

गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील गायत्री पन्हाळकर हिने मराठी विषयात १०० गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तिला वाणिज्य शाखेत एकूण ८७ टक्के गुण मिळाले आहेत. लहानपणापासूनच तिच्यावर मराठी भाषेचे संस्कार झाले. त्यामुळे शालेय जीवनापासून तिचे या विषयावर चांगले प्रभुत्व आहे, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले.
गायत्री पन्हाळकर घाटकोपर येथील रहिवासी आहे. तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही बारावीच्या महत्त्वाच्या वर्षात तिने मन लावून अभ्यास केला. त्याबरोबरच कथा, कविता आणि मराठी वृत्तपत्रांचे तिने नियमित वाचन केले. तिची मराठी भाषेची आवड जोपासण्यासाठी आई-वडीलही पुढाकार घेत आहेत. त्यामुळे तिला मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळाले.
गायत्रीने वाणिज्य शाखेचा नियमित अभ्यास करण्याबरोबरच मराठी विषयाकडे अधिक लक्ष दिले होते. तिला मराठी भाषेचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. आम्ही फक्त तिला प्रोत्साहन
दिले. निबंध लेखनात तिचा हातखंडा आहे. मराठीच्या आवडीमुळेच तिला पैकीच्या पैकी गुण मिळाले, असे झुनझुनवाला महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख दीपा ठाणेकर यांनी सांगितले. दरम्यान, गायत्री हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाने तिचे विशेष अभिनंदन केले आहे. पालक, मित्र-मैत्रिणी यांनी निकाल समजल्यानंतर तिचे पेढे भरवून कोडकौतुक केले.
मराठी कवितांची लहानपणापासूनच आवड
माझे प्राथमिक शिक्षण सरस्वती विद्यानिकेतन शाळेत झाले.
मला मराठी कवितांची लहानपणापासूनच आवड होती. ती आवड हळूहळू वाढली. शाळेत निबंध स्पर्धेत मी भाग घेऊ लागली. हळूहळू भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले. बारावीला वाणिज्य शाखेत जरी प्रवेश घेतला असला तरी, त्या विषयासोबत मी मराठी भाषेचा अभ्यास सोडला नाही. त्यामुळेच मला मराठीत चांगले गुण मिळाले.
गायत्री पन्हाळकर, विद्यार्थिनी, झुनझुनवाला महाविद्यालय