मुंबईमध्ये 'गॅस्ट्रो' आघाडीवर! ५ हजार ७७४ रुग्णांची नोंद; महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:43 IST2025-09-03T14:36:53+5:302025-09-03T14:43:21+5:30
महापालिकेने या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहरभर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे

मुंबईमध्ये 'गॅस्ट्रो' आघाडीवर! ५ हजार ७७४ रुग्णांची नोंद; महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सध्या शहर आणि उपनगरांमध्ये साथीचे विविध आजार बळावले आहेत. त्यामध्ये 'गॅस्ट्रोएन्टेरायटिस' (गॅस्ट्रो) च्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान गॅस्ट्रोचे एकूण पाच हजार ७७४ रुग्ण, मलेरियाचे पाच ७०६, डेंग्यूचे दोन हजार ३१९, चिकुनगुनिया आजाराचे ४८५, लेप्टोस्पायरोसिसचे ४७१, हिपॅटायटीस 'ए' व 'ई'चे ८१० आणि कोविडचे एक हजार १११ रुग्ण नोंदवले गेले.
साधारणतः दरवर्षी ऑगस्टमध्ये सार्थीच्या आजारांची रुग्णसंख्या उच्चांक गाठते. यंदा मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण गॅस्ट्रोच्या जवळपास गेले असले तरी गॅस्ट्रोने आघाडी घेतल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. दरम्यान, गॅस्ट्रो रुग्णसंख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत फारशी वाढ झालेली दिसलेली नाही. महापालिकेने या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहरभर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
मार्गदर्शनपर सत्रे
साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या पुढाकाराने तीन हजार २८४ गृहनिर्माण सोसायट्या आणि २६४ शाळांत जागृती सत्रे घेण्यात आली.
'शून्य डास प्रजनन' मोहिमेंतर्गत ५४५ इमारतींमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. वृत्तपत्रांमध्ये आजारांची माहिती प्रकाशित करून जनजागृती करण्यात आली आहे, तसेच तीन हजार ६८३ खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी निदान आणि उपचारांसंदर्भातील सत्रेही घेण्यात आली.
जिंगल्स हिट
'भाग मच्छर भाग' या मोहिमेंतर्गत एफएम रेडिओवरून जिंगल्स प्रसारित करून आजारांविरोधात जनजागृती केली जात आहे. महापालिकेने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि पाणी साठा टाळण्याचे आवाहन केले आहे.
शून्य डास प्रजनन मोहीम
महापालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने, 'आपला दवाखाना' आणि आरोग्य केंद्रांमध्येही शून्य डास प्रजनन मोहीम राबवली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळी जिंगल्स आणि पोस्टर्सद्वारे नागरिकांमध्ये रोग प्रतिबंधक उपायांची माहिती दिली जात आहे.