परवाना गारमेंट शॉपचा, सुरू होते बार, वाइन शॉप! ‘कमला मिल’मध्ये गैरप्रकार; अधिकृत बांधकामावर टाच, परवाना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:32 IST2025-08-06T14:32:43+5:302025-08-06T14:32:54+5:30

कमला मिल परिसरातील आयटी पार्कच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण तसेच अनधिकृतरीत्या रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. 

Garment shop license, bar, wine shop opens Misconduct in 'Kamala Mill'; Official construction is being challenged, license cancelled | परवाना गारमेंट शॉपचा, सुरू होते बार, वाइन शॉप! ‘कमला मिल’मध्ये गैरप्रकार; अधिकृत बांधकामावर टाच, परवाना रद्द

परवाना गारमेंट शॉपचा, सुरू होते बार, वाइन शॉप! ‘कमला मिल’मध्ये गैरप्रकार; अधिकृत बांधकामावर टाच, परवाना रद्द

 

मुंबई : कमला मिल कंपाउंड परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विड्स’ या आस्थापनाने गारमेंट शॉपचे रेस्टॉरंट बार आणि वाइन शॉपमध्ये रूपांतर मंगळवारी महापालिकेच्या पथकाला आढळून आले. त्यामुळे पालिकेने कारवाई करत त्यातील अनधिकृत बांधकामे तोडून टाकली आणि परवाना रद्द केला.
कमला मिल परिसरातील आयटी पार्कच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण तसेच अनधिकृतरीत्या रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. 

त्याची दखल घेत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी तेथे कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ३१ जुलैला 
थेओब्रोमा, मॅकडोनाल्ड्स, शिवसागर हॉटेल, नॅनोज कॅफे, स्टारबक्स, बीरा टॅप्रूम, टोस्ट पास्ता बार (फूड बाय देविका) व बीकेटी हाऊस या ठिकाणी पाडकाम व जप्तीची कारवाई केली होती. त्यापाठोपाठ सोमवारी आणि मंगळवारी ‘लिव्हिंग लिक्विड्स’ (मुंबई वाइन्स अँड ट्रेडर्स) या आस्थापनेची संयुक्त पाहणी करण्यात आली. 

चटई क्षेत्र नियमही धाब्यावर 
‘लिव्हिंग लिक्विड्स’ने तळमजला आणि पहिल्या मजल्यावर गारमेंट शॉपऐवजी रेस्टॉरंट बार व वाइन शॉप आणि तळमजल्यावर टेलरिंग शॉपऐवजी रेस्टॉरंट आणि डायनिंग, असे रूपांतर केल्याचे आढळून आले. 

चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करून उघड्या जागेवर आच्छादन आणि गच्चीवर अनधिकृत छत टाकले होते. त्याचबरोबर अनधिकृत भिंत बांधणे, परस्पर प्रयोजन बदलून शीतगृह बांधणे, दरवाज्यांच्या रचनेत परस्पर बदल करणे, लाकडी आणि काचेच्या भिंती उभारणे यांसह विविध बांधकाम अनियमितता, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण याठिकाणी आढळून आले. त्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली. 

Web Title: Garment shop license, bar, wine shop opens Misconduct in 'Kamala Mill'; Official construction is being challenged, license cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.