लसणाची फोडणी झाली महाग ! प्रति किलोचा दर ३०० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 09:48 IST2025-07-13T09:48:26+5:302025-07-13T09:48:32+5:30

बाजारात काही महिन्यांपूर्वी १५०-२०० रुपये किलोने मिळणारा लसूण सध्या जवळपास ३०० रुपये किलोने किरकोळ बाजारात मिळत आहे.

Garlic has become expensive! Price per kg has reached Rs 300 | लसणाची फोडणी झाली महाग ! प्रति किलोचा दर ३०० रुपयांवर

लसणाची फोडणी झाली महाग ! प्रति किलोचा दर ३०० रुपयांवर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मसाले, भाज्या यापाठोपाठ लसणाचाही भाव वाढत आहे. ३०० रुपये प्रति किलोने सध्या मिळणारा लसूण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गृहिणींनी फोडणीतून लसूण वगळला आहे. तर, काहींनी आखडता हात घेतला आहे.

बाजारात काही महिन्यांपूर्वी १५०-२०० रुपये किलोने मिळणारा लसूण सध्या जवळपास ३०० रुपये किलोने किरकोळ बाजारात मिळत आहे. तर, सोललेला लसूण ४०० रुपये किलोने मिळत आहे. लसूण सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचावा, यासाठी नोकरदार महिला बाजारात सोलून मिळणारा लसूण आवर्जून खरेदी करताना दिसतात.

लसणाचा सीझन फेब्रुवारी ते मेपर्यंत असल्याने पावसाळ्यात त्याची किंमत वाढते. यंदा अनेक भागाला अवकाळी पावसाने झोडपल्याने लसणाचे पीक कमी आले. लसणाच्या मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने लसणाचे दर वाढत आहेत.  दुसरीकडे भारतातील लसणाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने देशांतर्गत लसणाला मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत आहे. 

लसणाच्या दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण नवीन उत्पादन येईपर्यंत आवक कमीच राहणार आहे. गावरान लसूण ५०० रुपये किलोच्या वर असला, तरी त्या लसणाला मागणी आहे.
राजेश जाधव, किरकोळ विक्रेते 

स्वयंपाकासाठी लसणाची आवश्यकता असते. लसणाचे दर वाढले तरी मागणी कमी होऊ शकत नाही. मात्र, सामान्यांचे महिन्याचे बजेट या महागाईमुळे कोलमडत आहे.
आशा म्हात्रे, गृहिणी

Web Title: Garlic has become expensive! Price per kg has reached Rs 300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.