Join us

हिरवळ कमी होत असतानाच उद्यानांकडेही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 14:47 IST

gardens also neglected : उद्यानांकडे प्रशासनाने डोळेझाक केली.

 

मुंबई : गेल्या ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ असतानाच शहिद तुकाराम ओंबळे व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या दोन्ही उद्यानांकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. परिणामी दोन्ही उद्यानांची दुरावस्था झाली आहे. दोन्ही उद्याने नीट केली तर त्याचा फायदा स्थानिकांना होईल. परिणामी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे; आणि हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी स्थानिक स्तरातून होत आहे.

आरे कॉलनी येथील गोरेगाव चेक नाका येथे शहिद तुकाराम ओंबळे व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशी दोन उद्याने आहेत सहा महिन्यांपूर्वी उद्यानांची देखरेख व्यवस्थित होत होती. मात्र आता उद्यानाची दुरावस्था झाली आहे. शहिद तुकाराम ओंबळे उद्यानाची साफ सफाई होत नाही. सावरकर उद्यानाची अवस्था बिकट आहे. उद्यानात झाडे पडली आहेत. गवत वाढले आहे. परिणामी जनतेला उद्यानांचा काही फायदा होत नाही. दुग्ध विकास विभागाने या दोन्ही उद्यानाच्या देखरेखीसाठी कर्मचा-यांची नेमणूक करावी. अथवा महिला बचत गट किंवा सामाजिक संस्थांना ही उद्याने चालविण्यास द्यावी. जेणेकरून नागरिकांना याचा नीट वापर करता येईल, असे मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जमाती विभागाचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी सांगितले. याबाबतचे पत्रदेखील दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांना दिल्याचे कुमरे यांनी नमुद केले.

गेल्या ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ आहे. शहरातील एकूण ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ गेल्या २० वर्षांत कमी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका गोरेगावला बसला आहे. २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवाई असलेल्या गोरेगावमध्ये २०११ मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली. त्यापाठोपाठ अंधेरी पश्चिम व मालाड भागांतील हिरवळ कमी झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, सायन, परळ, दादर, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला व पवई या परिसरात हिरवाई व उद्यानांची कमतरता आहे.

टॅग्स :पर्यावरणसरकारमुंबईगोरेगाव