मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून साडेसात हजार रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 08:28 IST2025-04-01T08:28:04+5:302025-04-01T08:28:32+5:30
Mumbai Municipal Corporation: मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागणार असून या संदर्भातील मसुदा तयार झाला आहे. या मसुद्यावर नागरिकांकडून ३१ मे पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून साडेसात हजार रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार
मुंबई - मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागणार असून या संदर्भातील मसुदा तयार झाला आहे. या मसुद्यावर नागरिकांकडून ३१ मे पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. रहिवासी, व्यावसायिक मालमत्तांची जागा, वापर, कचरा निर्मिती याचा विचार करून १०० रुपयांपासून ते साडेसात हजारांपर्यंत हे शुल्क निश्चित करण्यात येणार आहे.
रहिवासी मालमत्तांना कचरा व्यवस्थापन सेवांसाठी ५० चौ.मी. क्षेत्रफळाच्या (बिल्ट अप) सदनिकेसाठी १०० रुपये, ५० ते ३०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या सदनिकेसाठी ५०० रुपये, तर तर ५००० चौ.मी.हून जास्त क्षेत्रफळ असलेल्या विवाह सभागृह, उत्सव, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणाऱ्या सभागृहासाठी ७,५०० रुपये प्रतिमाह घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल करण्यात येणार आहे.
मुंबईत महापालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ सध्या लागू आहेत. आतापर्यंत महापालिका सोसायट्या, चाळी, बहुमजली इमारती, हॉटेल आदी ठिकाणांहून विनाशुल्क कचरा घेऊन त्याची विल्हेवाट लावत आहे. त्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागतो. त्यामुळे केंद्राच्या सूचनेप्रमाणे सध्याच्या उपविधीमध्ये विविध शासकीय, प्रशासकीय बदलानुसार योग्य तो आढावा घेऊन नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. दरम्यान ३१ मे पर्यंत यासाठी सूचना व हरकती पाठवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. सूचना आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महसूल अपेक्षित
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला कचरा विल्हेवाटीतून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काही प्रमाणात कचरा संकलनाचा खर्च वसूल करण्यासाठी हे शुल्क प्रस्तावित आहे. यामुळे पालिकेला वार्षिक किमान ६०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
मालमत्ता (बिल्ट अप)- शुल्क / प्रति महिना (रुपये)
५० चौ. मी. क्षेत्रफळ सदनिका - १००
५० चौ. मी. क्षेत्रफळावरील सदनिका - ५००
३०० चौ. मी. क्षेत्रफळ सदनिका - १०००
दुकाने, सगळ्या
प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना - ५००
अतिथीगृह - २०००
वसतिगृह - ७५०
हॉटेल - १५००
३ स्टार हॉटेल - २५००
३ स्टारवरील हॉटेल - ७५००
व्यावसायिक कार्यालये, शासकीय कार्यालये, बँक, कोचिंग क्लास - ७५०
५० बेड्स क्लिनिक-२०००
५० बेड्सहून अधिक क्लिनिक - ४०००
५० चौ. मी. प्रयोगशाळा - २५००
५० चौ. मी. हून क्षेत्रफळाची प्रयोगशाळा - ५०००
१० किलोपर्यंत कचरा निर्मिती होणारे उद्योग - १५००
गोडाऊन, कोल्ड
स्टोअरेज - २५००
३००० चौ. मीटर क्षेत्रफळाचे लग्न कार्यालय, प्रदर्शन सभागृह - ५०००
३००० चौ. मीटरहून अधिक क्षेत्रफळाचे लग्न कार्यालय, प्रदर्शन सभागृह - ७५००