मुंबई : महाविकास आघाडीतील दरी वाढत असतानाच उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. 'सिल्व्हर ओक' या पवारांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली.
दोनच दिवसांपूर्वी महापालिका निवडणुका उद्धवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्यामुळे या भेटीत त्याबद्दल तसेच मविआत निर्माण झालेला वाद शमवण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
संजय राऊत म्हणाले, शरद पवारांनी नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले होते, त्याबाबत या भेटीत गप्पा झाल्या. त्यांनी जनसंघातील काही जुन्या आठवणी सांगितल्या. कदाचित त्या काळात अमित शहा राजकारणात नसतील, त्यांना जनसंघाचे आणि शरद पवारांचे नाते माहीत नसावे.