Join us

गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:59 IST

‘स्काय ३१’ प्रकल्प, संचालकांविरुद्धही गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वडाळा (पश्चिम) येथील ‘स्काय ३१’ या आलिशान गृहनिर्माण प्रकल्पामध्ये तब्बल १०० कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अनेक कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजी या प्रकल्पात गुंतवली होती. परंतु, आजही त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे काही प्रकरणांत एकच फ्लॅट दोन जणांना विकण्यात आला आहे. या प्रकरणी आरएके मार्ग पोलिस ठाण्यात बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शनसह संचालक सुब्बारामन आनंद विलायनुर (५२), उमा सुब्बारामन विलायनुर (४८) इतर संचालकांविरुद्ध १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

कांदिवलीत राहणारे चार्टर्ड अकाउंटंट अनिल मोहनलाल द्रोण (६२) यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांनी १५ जुलै २०२२ रोजी वडाळा कात्रक रोड येथील ‘स्काय ३१’ प्रकल्पातील सदनिका खरेदी केली होती. करारनाम्यानुसार डिसेंबर २०२४ पर्यंत घराचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्येही इमारत अपूर्ण असून, ताबा मिळालेला नाही. फक्त द्रोणच नव्हे, तर शेकडो खरेदीदार या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.  अशाच प्रकारे अन्य खरेदीदारांचीही फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. 

एकच फ्लॅट दोघांना विकला

राजेंद्र पाटील नावाच्या व्यक्तीने या इमारतीमध्ये दोन फ्लॅट बूक केले असून, फ्लॅट क्रमांक ३९०४ साठी त्यांनी सव्वा कोटी आणि  फ्लॅट क्रमांक ६०४ साठी २५ लाख एवढी रक्कम दिली. पाटील यांना  १६ जुलै २०२१  रोजी फ्लॅट क्रमांक ६०४ हा ‘ॲग्रीमेन्ट फॉर अलॉटमेंट ऑफ युनिट’ करून दिलेला असताना आरोपींनी कोणतीही पूर्वसूचना न देता तोच फ्लॅट १ सप्टेंबर २०२२ रोजी अमर कुलकर्णी व रिचा कुलकर्णी यांना ‘रजिस्ट्रेशन ॲग्रीमेन्ट फॉर सेल’ करून विकल्याचे समजले.

सदनिकेसाठी पैसे उकळल्याचा आरोप, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या बँकिंग ३ विभागाकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. २०१८ ते आतापर्यंत ही फसवणूक झाली आहे. संबंधित कागदपत्रे ताब्यात घेत चौकशी सुरू आहे. प्रकल्पाचे विकासक बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि त्यांचे संचालक सुब्बारामन आनंद विलायनुर व उमा विलायनुर यांनी संगनमत करून  ‘स्काय ३१’ प्रकल्पातील १५९ पैकी १०२ सदनिका विकून कोट्यवधी रुपये गोळा केले. विकासकाने फ्लॅट विक्री करून जमा केलेली रक्कम अनिवार्य केलेल्या बांधकामासाठी न वापरता काही रक्कम अन्य कंपन्यांमध्ये वळवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gangar Construction faces fraud charges: 100 Cr scam, same flat sold twice!

Web Summary : Gangar Construction booked for ₹100 Cr fraud in Wadala's 'Sky 31' project. Multiple buyers duped, one flat sold to two parties. Investigation transferred to Economic Offences Wing after complaint by CA.
टॅग्स :मुंबईसुंदर गृहनियोजनधोकेबाजी