Join us

उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 06:45 IST

मंडळाच्या मंडपात सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असतात तसेच सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना केली जाते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करावे, असे न्यायालयाचे आदेश आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात मोठ्या मूर्तींसोबत लहान मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करतात. लहान मूर्तींची उंची सहा फुटांपेक्षा कमी असल्याने त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार आहे. त्यामुळे एकाच मंडळाला मूर्तीच्या विसर्जनासाठी दोन विसर्जन स्थळे गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

उच्च न्यायालयाने सहा फुटावरील उंचीच्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक केले आहे. मुंबईत साधारणपणे दहा हजार सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. या मंडळाच्या मंडपात सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असतात तसेच सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना केली जाते. 

न्यायालयाच्या आदेशानुसार लहान आकाराच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक आहे. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना दोन विसर्जन स्थळी धाव घ्यावी लागेल, असे काही मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठ्या मूर्तींसोबत लहान मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. 

कृत्रिम तलावावर गर्दी 

मोठ्या मंडळाच्या मंडपातील लहान मूर्ती जर विसर्जन स्थळे अर्थात कृत्रिम तलावांच्या ठिकाणी आल्या तर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते. कृत्रिम तलावात प्रामुख्याने घरगुती मूर्तींचे विसर्जन होते त्यात आता मंडळाच्या लहान मूर्तींची भर पडणार आहे.

कायमस्वरूपी तोडगा काढा

न्यायालयाने मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास फक्त एका वर्षापुरती परवानगी दिलेली आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्य सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, कारण पुढील वर्षीही पुन्हा असा पेच निर्माण होऊ शकतो, असे बृहन्मुंबई सार्वजनिक समितीचे म्हणणे आहे. त्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असेही यांच्यावतीने सांगण्यात आले.

 

टॅग्स :गणपती 2024गणेश चतुर्थी २०२४मुंबई हायकोर्टमुंबई महानगरपालिका