मुंबई - गणेशोत्सवानिमित्त गणेश गल्ली अर्थातच 'मुंबईच्या राजा'पासून तेजूकाया मेन्शनपर्यंत आणि काळाचौकी येथील महागणपतीपासून चिंचपोकळीच्या 'चिंतामणी 'पर्यंतचा परिसर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी फुलून गेला आहे. शुक्रवार २९, शनिवार ३० आणि रविवार ३१ ऑगस्टच्या रात्री तसेच गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर आणखी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे.
पहिल्या दोन दिवसांतच राज्याच्या देशभरातून लालबागमध्ये दाखल झालेल्या भाविकांनी खेतवाडीसह मध्य मुंबईतील राजांच्या चरणी माथा टेकत मनोभावे दर्शन घेतले. परळपासून लालबाग, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा, काळाचौकी खेतवाडी येथील विविध सार्वजनिक मंडळांची सुबक गणेश मूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीत वाढ होते आहे. गणेश गल्लीपासून नरे पार्कचा राजा आणि खेतवाडीतल्या मूर्ती भक्तांना आकर्षित करत आहेत.
मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून लालबागची ओळख आहे. लालबाग-परळमध्ये प्रतिष्ठापना झालेल्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी केवळ राज्य नाही तर देशभरातून भाविक दाखल होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत आहे.- पूजा गणाचार्य
लालबाग-परळमधील घराघरांत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. चाळीत मोठ्या थाटामाटात गणेशोलाव साजरा होत असून, आता गौराईच्या आगमनानंतर तर उत्सवाला चार चांद लागतील. श्रींची प्रतिष्ठापना होण्याच्या एक दिवस अगोदरपासून लालबाग हाऊसफुल्ल झाले आहे. उर्वरित आठ दिवसांत येथील गर्दीचा आलेख आणखी वाढलेला पाहायला मिळेल,- मृणाल शेटवे
मुंबईच्या राजाचे यंदा १८ वे ठर्ष असून यावर्षी तामिळनाडूतील रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. भाविकांचे दर्शन व्यवस्थित व्हावे, यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे.- किरण तावडे, अध्यक्ष, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (गणेश गल्ली)