Join us

Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:44 IST

Ganesh Visarjan Day 2: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणेशभक्तांनी गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणेशभक्तांनी गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईत काल एकूण ५९ हजार ४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, यात  ५८,६८७ घरगुती गणपती मूर्ती आणि ६९७ सार्वजनिक मूर्तींचा समावेश होता. 

गणेशोत्सवानिमित्त गुरुवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गुरुवारी दुपारपासूनच दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्तांचे डोळे पाणावले. ठाणे शहरात दुपारपासूनच विसर्जन घाटांवर गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.

यावर्षी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी बीएमसीने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली. शहरात एकूण २८८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, पीओपीपासून बनलेल्या सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक आहे. तर, त्यापेक्षा मोठ्या मूर्तींना समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी आहे

मुंबईत कुठे, किती कृत्रिम तलाव?

सार्वजनिक श्रीगणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेकडून यावर्षी २८८ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. भाविकांनी या कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणरायाच्या मूर्ती विसर्जित कराव्यात, असे विनम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जी-दक्षिण (वरळी) मध्ये २४ तलाव, ई वॉर्ड (भायखळा) मध्ये २० तलाव, आर-दक्षिण (कांदिवली) मध्ये १८ तलाव, एफ-दक्षिण (परळ) मध्ये १७ तलाव, एस वॉर्ड (भांडुप) मध्ये १५ तलाव आणि पी-दक्षिण (गोरेगाव) मध्ये १४ कृत्रिम तलाव उभारण्यात आले.

टॅग्स :गणेश विसर्जनमुंबईमहाराष्ट्रगणेश चतुर्थी