गौराईचा साजशृंगार, नैवेद्यासाठी महिला वर्गाची लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:04 IST2025-08-25T13:00:59+5:302025-08-25T13:04:12+5:30
Ganesh Mahotsav News: गणरायाबरोबरच माहेरवाशीण असलेल्या लाडक्या गौराईचे आगमन व पूजेच्या तयारीत मुंबईकर व्यस्त आहेत. गौराईच्या मुखवट्यांपासून ते साड्यांपर्यंत आणि दागिन्यांपासून ते फुले व मिठान्नांपर्यंत विविध साहित्याने बाजार सजला आहे.

गौराईचा साजशृंगार, नैवेद्यासाठी महिला वर्गाची लगबग
- सीमा महांगडे
मुंबई - गणरायाबरोबरच माहेरवाशीण असलेल्या लाडक्या गौराईचे आगमन व पूजेच्या तयारीत मुंबईकर व्यस्त आहेत. गौराईच्या मुखवट्यांपासून ते साड्यांपर्यंत आणि दागिन्यांपासून ते फुले व मिठान्नांपर्यंत विविध साहित्याने बाजार सजला आहे. पाहुण्या गौराईच्या आदारातिथ्यासाठी, नैवेद्याच्या तयारीत महिलावर्ग व्यस्त आहे.
गौरी बसविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी लालबाग, दादर, परळ, भुलेश्वर मार्केट, मंगलदास मार्केट याठिकाणी नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. गौरी उभ्या करण्यासाठी लागणारे स्टँड, मुखवटे, साडी, दागिने, पाउलजोड आणि डेकोरेशनसाठी लागणाऱ्या दिव्यांचा माळा बाजारात उपलब्ध आहेत.
गौरीच्या मुखवट्यांमध्ये हसरा मुखवटा, अमरावती मुखवटा, सातारी मुखवटा, महालक्ष्मी मुखवटा आणि एकवीरा मुखवटा आदींना विशेष मागणी आहे. हे मुखवटे लाकूड, फायबर, पीओपी, प्लास्टिकपासून तयार केले जातात. तर, यातील पीओपी चंदन पेंट मुखवटा आणि वॉर्निश पेंट मुखवट्याला अधिक मागणी असून, हे मुखवटे ३५० रुपयांपासून २८०० पर्यंत मिळतात. तर शिवण लाकडापासून बनवलेल्या लाकडी मुखवट्यांसह पूर्ण गौराई ही ३५ हजारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.
दागिन्यांचा साज
गौरीच्या शृंगारासाठी लक्ष्मीहार, चपलाहार, मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, राणीहार, मंगळसूत्र, मोत्यांचे दागिने, नथ, कमरपट्टा, बांगड्या या दागिन्यांचा वापर केला जातो. या पारंपरिक दागिन्यांसोबत ऑक्सिडाइज दागिन्यांचीही महिलांमध्ये क्रेझ असल्याचे दिसून येत आहे.
नऊवारी साड्यांना पसंती
गौरींना साडी नेसवणे ही खरी कला आहे, पण सर्वांनाच ते जमते असे नाही. हीच समस्या लक्षात घेऊन रेडिमेड साड्या विक्रीस आल्या आहेत. सहावारी, नऊवारी, मस्तानी नऊवारी, कोळी नऊवारी, ब्राह्मणी नऊवारी, त्रिवेणी नऊवारी अशा रेडिमेड साड्या बाजारपेठेत मिळत आहेत.
गौरीसाठी लागणाऱ्या
साहित्याचे दर (रुपयांमध्ये)
लाकडी गौरी ३५,००० पर्यंत
फायबरच्या गौरी २,५०० रुपयांपर्यंत
प्लास्टिक गौरी १,५०० रुपयांपासून
गौरीचे स्टँड ५०० ते ६०० (उंचीनुसार)
मुखवटा ३०० ते २,८०० रुपयांपर्यंत
बसलेली गौरी १५,५०० पर्यंत
उभी गौरी ७,५०० ते १६,५०० रुपयांपर्यंत
साडी ७५० रुपये ते ३,००० पर्यंत
दागिने १०० रु. ते १० हजारपर्यंत