1 लाख गणसेवकांची फौज, पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी होणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 01:49 PM2023-09-12T13:49:19+5:302023-09-12T13:49:59+5:30
Ganesh Mahotsav:
- सचिन लुंगसे
मुंबई - मुंबापुरीतल्या गणेशोत्सवादरम्यान पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ नये आणि गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव मंडळातील १ लाख कार्यकर्त्यांची ‘गणसेवक’ म्हणून निवड केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून या गणसेवकांना पोलिस प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे पोलिसांवर ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांसोबत गणेश उत्सवाबाबत सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून मुंबईतले रस्ते, पूल, चौपाटी; एकंदर गणेशोत्सवा दरम्यान लागणाऱ्या सर्व पायाभूत सेवासुविधा सज्ज असाव्यात यासाठी बैठकांच्या माध्यमातून काम केले जात आहे. पुढचे पंधरा दिवस मुंबईत बाहेरून येणारी गर्दी वाढणार असून गेल्या काही वर्षातील अनुभव लक्षात घेता अशा उत्सवादरम्यान घातपाताची शक्यता देखील वर्तविण्यात येते.
- गणेशोत्सव समन्वय समितीचा अनोखा उपक्रम
- गणसेवकांना देणार पोलिस प्रशिक्षण
- मुंबईत बाहेरून येणारी गर्दी वाढणार
यंदाच्या गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासनाकडून विविध स्तरावर पूर्वतयारी सुरू.
यंदा मुंबईत विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता, वृक्षछाटणी आदी कामेही सुरू.
निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमूणक.
उत्सव, मंडप याची काळजी घेणे हे आपले काम आहे. प्रत्येक मंडळाला एक पोलिस देण्यात आला असला तरी त्यावर ताण येता कामा नये. यासाठी उपक्रम आहे. पोलिस हे गणसेवकांना एक दिवस प्रशिक्षण देतील. त्यामुळे पुढे कसे काम करणे आहे हे त्यांना समजेल.
- ॲड. नरेश दहिबावकर,
अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती
प्रत्येक मंडळातून २० कार्यकर्ते नेमणार
एकंदर मुंबईचा गणेशोत्सव जोरदार साजरा व्हावा आणि हा उत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अधिक सज्ज राहावे यासाठी समितीने हा प्रस्ताव मुंबई पोलिसांसमोर ठेवला होता.
पोलिसांनी देखील त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार छोटी गणेशोत्सव मंडळ आणि मोठी गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून गणसेवक तयार केले जातील.
छोट्या मंडळाचे १० आणि मोठ्या मंडळाचे २० असे एकूण एक लाख गणसेवक तयार होतील.
रेल्वेमार्गावरील काही पूल धोकादायक असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू.
काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्यामुळे मिरवणुकीदरम्यान पुलांवरून जाताना काळजी घ्यावी.