Ganesh Festival 2019 : भांडुपमध्ये धान्यांपासून साकारला गणराया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:09 IST2019-09-10T16:02:53+5:302019-09-10T16:09:05+5:30
शिवसाई मित्र मंडळाने यंदा धान्यांपासून गणराया साकारला आहे. गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी या धान्यांचा वापर करून बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आली आहे.

Ganesh Festival 2019 : भांडुपमध्ये धान्यांपासून साकारला गणराया
मुंबई - लाडक्या गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. गणेशोत्सवात बाप्पाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करुन चांगला संदेश दिला जातो. पर्यावरणपूरक सजावट करण्याकडे अनेकांचा कल असतो. गणपतीची मोहक मूर्ती ही आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. विविध वस्तूंचा वापर करून बाप्पा साकारला जातो. भांडुप पूर्व येथील दातार कॉलनीत शिवसाई मित्र मंडळाने यंदा धान्यांपासून गणराया साकारला आहे. गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी या धान्यांचा वापर करून बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आली आहे.
शिवसाई मित्र मंडळाचे यंदाचे हे 22 वे वर्ष आहे. मूर्ती तयार करण्यासाठी 17 किलो गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी या धान्यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागला. मंडळाने यावर्षी वारली पेटिंग ही थीम घेऊन सुंदर सजावट केली आहे. धान्यापासून बाप्पा साकारून दरवर्षीप्रमाणे यावेळीही मंडळाने आपलं वेगळपण दाखवलं आहे. यावर्षी गणेशोत्सवात होणारा जास्तीचा खर्च टाळून जमा झालेली रक्कम ही पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तसेच दानपेटीत जमा झालेली रक्कम आणि आवश्यक वस्तू या पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणार आहेत.
मागील काही वर्षांपासून शिवसाई मित्र मंडळ पर्यावरणपूरक वस्तूंपासून गणेशमूर्ती तयार करतं. सुंदर सजावट करून सामाजिक संदेश देतं. याआधी तब्बल 30 हजार जेम्स चॉकलेटच्या गोळ्यांपासून बाप्पाची मूर्ती तयार केली होती. तसेच मंडळाने बालक पालक ही थीम घेऊन आई-वडील आणि मुलांमधला जनरेशन गॅप आणि त्यांच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी आरास साकारली होती. शेंगदाण्यापासून, कागदापासून, फुलांपासून, गरम मसाल्यांपासून, साखरेपासून, कडधान्यांपासून मंडळाने गणेशमूर्ती साकारली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात लहान मुलांसाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी शिवसाई मित्र मंडळ निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतं. सामाजिक जाबाबदारीचं भान राखत बेटी बचाओ आंदोलन, आरोग्य शिबीर यासारख्ये उपक्रम हाती घेण्यात येतात. प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, स्त्री भ्रूण हत्या यासारख्या विषयांवर देखावा केला आहे. मंडळाने थर्माकॉल, प्लास्टिक यासारख्या गोष्टींचा वापर न करता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा सर्वांना संदेश दिला आहे.
Ganesh Festival 2019 : बाप्पासाठी घरात साकारला साडेपाच फुटांचा इकोफ्रेंडली शनिवारवाडाhttps://t.co/GNPKpXbtJR#GaneshChaturthi2019
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2019