गणपती बाप्पा, शाडूची माती लवकर मिळू दे! मूर्तिकारांना महापालिकेकडून मिळणाऱ्या मातीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:11 IST2023-08-01T14:10:23+5:302023-08-01T14:11:34+5:30
गणेश चतुर्थी दीड महिन्यावर असून, या मूर्तिकारांना अद्याप पालिकेकडून माती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे माती मिळणार कधी, मूर्ती घडवणार कधी, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे.

गणपती बाप्पा, शाडूची माती लवकर मिळू दे! मूर्तिकारांना महापालिकेकडून मिळणाऱ्या मातीची प्रतीक्षा
मुंबई : महापालिकेने प्रदूषण टाळण्यासाठी मुंबईकरांकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यासाठी मूर्तिकारांना मोफत शाडूची माती देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मात्र, गणेश चतुर्थी दीड महिन्यावर असून, या मूर्तिकारांना अद्याप पालिकेकडून माती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे माती मिळणार कधी, मूर्ती घडवणार कधी, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे.
निसर्गाची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने यंदा घरगुती गणेशमूर्ती चार फूट उंचीपर्यंतची व त्या शाडू माती अथवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर शाडूची माती मूर्तिकारांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१९ सप्टेंबरला गणेशोत्सव असून, अद्याप शाडूची माती न मिळाल्याने मूर्तिकारांमध्ये चलबिचल वाढली आहे. भाविक मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तींची अॉर्डर देण्यासाठी येत असतात. मात्र शाडू मातीच कधी मिळणार याची शास्वती नसल्याने त्या अॉर्डरी कशा स्वीकारायच्या, असा प्रश्न मूर्तीकार उपस्थित करीत
आहेत.
नवरात्रीपर्यंत मोफत जागा
शाडूच्या मातीपासून किंवा पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर महानगरपालिकेतर्फे निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणारी जागा नवरात्रोत्सवाच्या समाप्तीपर्यंतच्या कालावधीपर्यंत वापरता येईल. त्यासाठी त्यांना शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणारे मूर्तिकार, साठवणूकदार असल्याचे हमीपत्र महापालिकेला देणे बंधनकारक आहे.
२३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज
केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच मूर्ती घडविणारे मूर्तिकार महानगरपालिकेतर्फे यंदाच्या वर्षीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर ७ जुलैला सकाळी ११ वाजेपासून प्रक्रिया सुरू केली आहे. ही संगणकीय प्रणाली २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.