'शूटिंग'च्या नावाखाली भीतीचा खेळ अन् आजीने दाखवले धैर्य
By मनीषा म्हात्रे | Updated: October 31, 2025 07:02 IST2025-10-31T07:02:33+5:302025-10-31T07:02:49+5:30
या थरारक प्रसंगात एका आजीने दाखवलेले धैर्य चित्रपटालाही लाजवेल असे होते.

'शूटिंग'च्या नावाखाली भीतीचा खेळ अन् आजीने दाखवले धैर्य
मनीषा म्हात्रे
मुंबई : 'शूटिंग सुरु आहे' असा भास निर्माण करून काही निरागस मुले आणि त्यांच्या पालकांना भीतीच्या जाळ्यात अडकवले. या थरारक प्रसंगात एका आजीने दाखवलेले धैर्य चित्रपटालाही लाजवेल असे होते.
कोल्हापूरमधून आलेल्या या आजी आणि नातीचे स्वप्न होते - एक छोटा रोल, एक संधी, थोडंसं शूटिंग. सकाळपासूनच ऑडिशन सुरू होते. आजी सांगतात, नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी आलो. माझी नातीची पण शूटिंगसाठी निवड झाली. शाळेतूनच या ऑडिशनबाबत समजले होते. दुपार झाली तरी मुलांना बाहेर सोडण्यात आले नाही. मी पडदा बाजूला करून पाहिले आणि तिथूनच सुरू झाला खरखुरा थरार. 'सगळे जण रडत होते. मुलं घाबरलेली. मी मुलीला फोन केला, तेव्हा समजले आम्हाला किडनॅप केलंय!' रुग्णालयात उपचार घेतलेल्या आजीच्या आवाजात अजूनही त्या क्षणाचा कंप जाणवत होता.
'सुरुवातीला वाटलं सिन चालू आहे, म्हणून दरवाजा बंद केला. पण जेव्हा खाली रडण्याचे आवाज आले, तेव्हा सगळं बदललेलं. मुख्य सरांनी आम्हाला पालकांना कॉल करून 'पैसे देऊन मुलांना घेऊन जा' असे सांगितले. आम्ही काही बोललो की ते आम्हाला मारत होते,' असे सुटका झालेल्या एका मुलीने सांगितले. भीतीच्या सावलीत आजीनेच पुढाकार घेतला. 'मी खालच्या मजल्यावरून दोन बाटल्या पाणी आणून दिले. मुलं रडायला लागली म्हणून सांगितलं, 'शूटिंग सुरु आहे'. त्यांना शांत ठेवणं गरजेचं होतं. त्यानंतर काही तासाने तिथे असलेल्या दुसऱ्या सरांनी कुलूप तोडून दुसऱ्या खोलीत नेले. मी दरवाजा आतून लावला आणि ठरवले काहीही झालं तरी मुलांना वाचवायचं.' मुलीला कॉल करून खाली असलेल्या प्रत्येक पालकांशी बोलणे करून दिले. आयुष्यभर लक्षात राहील असा थरार अनुभवल्याचे आजी सांगतात.