Join us

'हा खेळ सावल्यांचा'... मनसेच्या 'शॅडो' कॅबिनेटची शिवसेनेकडून टिंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 09:24 IST

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे मनसेवर टीका केली होती. शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही

मुंबई - मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. मनसेच्या शॅडो कॅबिनेटचे भाजपाने स्वागत केले आहे. मात्र, काँग्रेसने मनसेच्या या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. आता, शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर टीका केलीय. 

''महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता 'शॅडो' कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा' नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. 'शॅडो'ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ''जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.'' हे बरे झाले. पुन्हा 'शॅडो'वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा 'शॅडो' राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे 'खेळ सावल्यांचा' अधिकच रंगतदार झाला असता,'' असे म्हणत शिवसेनेनं मनसेची चांगलीच टिंगल उडवली आहे. विशेष म्हणजे मनसेच्या शॅडो कॅबिनेट विनोद म्हटलंय. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं, असा टोला लगावलाय. 

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे मनसेवर टीका केली होती. शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही. आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत. त्यामुळे याचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित, असे म्हणत सचिन सावंत यांनी मनसेवर निशाणा साधला होता. त्यानंतर, आता शिवसेनेनं मनसेच्या शॅडो कॅबिनेट स्थापनेची खिल्ली उडवलीय.  दरम्यान, मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची नावे घोषित केली. त्यामध्ये सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात राज्यभरातील प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.  

टॅग्स :शिवसेनामनसेराज ठाकरेमुंबई