गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, निरूपम यांचा इशारा

By मनोहर कुंभेजकर | Published: November 13, 2022 04:04 PM2022-11-13T16:04:58+5:302022-11-13T16:05:38+5:30

गजानन किर्तीकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता

Gajanan kirtikar should give resignation loksabha congress leader sanjay nirupam | गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, निरूपम यांचा इशारा

गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, निरूपम यांचा इशारा

googlenewsNext

"खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा," अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे. तसंच किर्तीकर राजीनामा देत नाहीत तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. वर्सोवा येथील ब्रेव्हरली हिल्स सोसायटीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निरुपम बोलत होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तीकर उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून कीर्तीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार निरुपम यांचा पराभव केला होता.

निरुपम म्हणाले की, "खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांचा होता, त्यावर मला काही बोलायचं नाही. त्यांनी का आणि कोणत्या अमिषाला बळी पडून पक्ष सोडला यातही मला जायचं नाही. पण माझं असं मत आहे की, शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली होती, धनुष्य-बाण चिन्हावर तुम्ही निवडून आला होता. आता जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आहे, त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा. ही गद्दारी आहे." "ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणलं त्यांच्याशी केलेला विश्वासघात आहे. तुम्हाला जास्त मत मिळाली म्हणून तुम्ही निवडून आला आणि कमी मिळाली त्यामुळे मी पराभूत झालो. त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल," अशी मागणी निरुपम यांनी केली.

गजानन किर्तीकर मागच्या साडे तीन वर्षांच्या कालखंडात उत्तर-पश्चिम मतदारसंघात कधीच दिसले नाहीत. कधीच नाहीत. देशातील सर्वात जास्त निष्क्रिय खासदार ते असतील असा आरोप त्यांनी केला. "मी पराभूत उमेदवार असूनही त्यांच्यापेक्षा जास्त मी मतदारसंघात फिरलो, लोकांमध्ये जात राहिलो. काम करत राहिलो. मी एकदा माहिती काढली की किर्तीकर सध्या काय करत आहेत याची आपण माहिती काढली असता तेव्हा कळलं की, त्यांची तब्येत बरोबर नाही. ते मुंबईतही नव्हते. ते सर्वाधिक काळ पुण्यात राहायला असायचे. आता ते पुण्यात का होते? काय करायचे? कोणासोबत असायचे याबाबत मला जास्त बोलायचं नाही," असे निरुपम म्हणाले.

विश्वासघात केलाय
पण तुम्ही मुंबईच्या मतदारांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे किर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनाची सुरुवात करत आहोत. बाईक रॅलीपासून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन होईल. जर किर्तीकर यांच्यात थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यापूर्वी राजीनामा द्यावा आणि पुण्यामध्ये आरामात उर्वरित आयुष्य घालवावं, अशी आक्रमक भूमिका निरुपम यांनी मांडली.

Web Title: Gajanan kirtikar should give resignation loksabha congress leader sanjay nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.