"पितळ उघडे पडले म्हणून पित्त खवळले...."; गजानन कीर्तिकर-रामदास कदम वादाचे फटाके

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:09 AM2023-11-14T08:09:30+5:302023-11-14T08:13:14+5:30

कीर्तिकर यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात कदमांनी पक्षाशी कशी गद्दारी केली याचे पाढे वाचले.

Gajanan Kirtikar and Ramdas Kadam are seen criticizing each other | "पितळ उघडे पडले म्हणून पित्त खवळले...."; गजानन कीर्तिकर-रामदास कदम वादाचे फटाके

"पितळ उघडे पडले म्हणून पित्त खवळले...."; गजानन कीर्तिकर-रामदास कदम वादाचे फटाके

मुंबई : ऐन दिवाळीत शिंदे गटातील नेते रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्यात वादाचे फटाके फुटत आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून पेटलेल्या या वादात कीर्तिकरांच्या प्रसिद्धीपत्रकाने भर पडली असून, त्याला उत्तर देताना गजाभाऊंचे वय झालेय, त्यांना डॉक्टरांची गरज असल्याचा पलटवार कदम यांनी  केला आहे.

कीर्तिकर यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात कदमांनी पक्षाशी कशी गद्दारी केली याचे पाढे वाचले. आता हेच पाढे कदमांनी वाचायला सुरुवात केली असून, कीर्तिकर हेच पक्षासोबत गद्दारी करीत आहेत. गोरेगाव येथील कार्यालयात वडील आणि मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदारकीचा निधी मुलाला विकासकामे करण्यासाठी देत आहेत, असे कदम यांनी म्हटले. 

काय आहेत कीर्तिकर यांचे आरोप ? 
रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. १९९० साली मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो, त्याचवेळेला कदम खेडमधून निवडणूक लढत होते.  माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप कीर्तिकर यांनी आपल्या पत्रातून केला. 

पितळ उघडे पडले म्हणून पित्त खवळले
कदम यांनी कीर्तिकर यांचे आरोप फेटाळताना म्हटले की, अनंत गीतेंनी मला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने गुहागरमधून पाडले.
त्यामुळे ज्या गीतेंनी मला पाडले त्यांचा प्रचार करणार नाही, असे म्हटले. तेव्हा मला राज्यात इतरत्र पाठविण्यात आले. गद्दारी मी नाही करत, तुम्ही करीत आहात. तुमचे पितळ उघड पडले म्हणून तुमचे पित्त खवळल्याची टीका कदम यांनी केली. 

‘भाजपच जागा लढवेल’ 
बाळासाहेबांच्या ज्या विचारांसाठी हे गेले म्हणताहेत, त्याच बाळासाहेबांच्या काळात यांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याची काम केले. ही गद्दारी नाही का? यांच्या भांडणात ही सीट भाजप लढवेल, अशी टीका ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली.

‘कशाला पाडायला येऊ’ 
कदम म्हणाले की, १९९० साली मी कांदिवलीत एक शाखाप्रमुख होतो. मला शिवसेनाप्रमुखांनी खेड मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी केशव भोसले यांच्यासोबत माझी लढत होती. त्यांना दाऊदचा पाठिंबा होता. माझा संघर्ष तिकडे असताना गजाभाऊंना मालाडमध्ये कशासाठी पाडायला येऊ. 

Web Title: Gajanan Kirtikar and Ramdas Kadam are seen criticizing each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.