‘जी साऊथ वॉर्ड’ मलेरियाचा ‘हॉटस्पॉट’! ड्रोनचा वापर करून केली जातेय फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:40 PM2023-07-24T12:40:13+5:302023-07-24T12:40:31+5:30

या वॉर्डमधील वाढत्या रुग्णसंख्येची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली असून, ही रुग्णवाढ रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'G South Ward' Malaria 'Hotspot'! Spraying is done using drones | ‘जी साऊथ वॉर्ड’ मलेरियाचा ‘हॉटस्पॉट’! ड्रोनचा वापर करून केली जातेय फवारणी

‘जी साऊथ वॉर्ड’ मलेरियाचा ‘हॉटस्पॉट’! ड्रोनचा वापर करून केली जातेय फवारणी

googlenewsNext

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क
 

मुंबई : शहरात पावसाळी आजारांचे प्रमाण वाढत असले तरी त्यामध्ये जी साऊथ वॉर्डमधील (वरळी-प्रभादेवी) परिसरात मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वॉर्डमधील वाढत्या रुग्णसंख्येची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली असून, ही रुग्णवाढ रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. संयुक्तपणे या वॉर्डात काम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सहजरीत्या पोहोचता येत नाही, त्या ठिकाणी ड्रोनचा वापर करून कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
लक्षणे? 

तापाचे प्रमाण सौम्य ते गंभीर असते. डोकेदुखी, ताप, पोट दुखणे, उलट्या-मळमळ, स्नायू दुखणे, अशक्तपणा ही लक्षणे आहेत.

डास होण्यास कारण की...

  जी साऊथ वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी, अडगळीच्या जागा आहेत. त्या ठिकाणी अनेकवेळा फारसे कुणाचे लक्ष जात नाही. मात्र, असे वातावरण डासांसाठी अनुकूल असते. या भागात अनेक गिरण्या आहेत. 
  त्याच्या आतमध्ये छतावर व आजूबाजूला अनेकदा घाणीचे साम्राज्य असते. तसेच या वॉर्डमध्ये अनेक ठिकाणी अडगळीचे सामान वर्षानुवर्षे पडून आहे. त्यामध्येही पाण्याची डबकी साचून राहतात. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी डासांचे साम्राज्य निर्माण होत असते. 

डॉक्टरांना केव्हा भेटावे?

मलेरियाचे रुग्ण वाढत असलेल्या परिसरात राहात असल्यास  ताप आल्यावर डॉक्टरांना भेटावे. मलेरिया आजाराचे वेळीच निदान करून त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे. गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना हा आजार झाल्यास तत्काळ निदान करून उपचार घेणे गरजेचे आहे अन्यथा ते जीवघेणे ठरू शकते. शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे. मलेरियाप्रवण क्षेत्रात राहताना किंवा प्रवास करताना तुम्हाला खूप ताप येत असल्यास वैद्यकीय मदत घ्या.

रुग्णवाढीची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. रुग्णवाढ रोखण्याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत. अपर आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या प्रकरणी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन संबंधितांना मलेरिया प्रतिबंधाबाबत काही सूचना केल्या आहेत. संबंधितांनी त्याचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल.
- डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, पालिका 

सीएसआर फंडातून हा ड्रोन मिळाला आहे. गेली चार वर्षे ड्रोनद्वारे फवारणी करत आहोत. ड्रोन उडविण्यासाठी पोलिसांकडून रितसर परवानगी घेतली आहे. खास पायलटही आहेत. पावसाळ्यात बंद पडलेल्या मिल आणि रेल्वे यार्ड परिसरात ड्रोनने फवारणी सुरूच राहील.
- चेतन चौबळ, कीटकनाशक अधिकारी
 

Web Title: 'G South Ward' Malaria 'Hotspot'! Spraying is done using drones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.