Future scientists will be created from the invention research competition - Samant | आविष्कार संशोधन स्पर्धेतून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होणार- सामंत

आविष्कार संशोधन स्पर्धेतून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होणार- सामंत

मुंबई : सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजोपयोगी संशोधनाची बीजे रोवण्यासाठी आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धा या महत्त्वाच्या असून अशा स्पर्धांच्या आयोजनातून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होणार असल्याचा आशावाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी आणि विद्यापीठातील संशोधन संस्कृतीला पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. ते मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आयोजित केलेल १४व्या महाराष्ट्र आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
राज्यातील विद्यापीठातून होणारे संशोधन हे जागतिक दर्जाचे व्हावे, तसेच येथील संशोधकांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगून मार्गक्रमण करावा, असा सल्लाही त्यांनी तरुण संशोधकांशी संवाद साधताना दिला. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला रथ हा राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.
राज्य सरकारमार्फत सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वापर कसा करता येईल यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
२८ ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान आयोजित केलेल्या १४व्या महाराष्ट्र आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेचे हे १४वे वर्ष असून राज्यातील सर्व २० विद्यापीठे या स्पर्धेत सहभागी होत असतात. चार दिवस चालणाºया या संशोधन स्पर्धेसाठी राज्यातील सर्व २० विद्यापीठांतील एकूण जवळपास एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
मानव्यविज्ञान, भाषा, फाइन आर्ट, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी, मूलभूत शास्त्रे, शेती व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आणि वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र या वर्गवारीतून आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी एकूण ९६० एन्ट्रीज विद्यापीठास प्राप्त झाल्या आहेत.

समाजाला दैनंदिन जीवनात भेडसावणाºया प्रश्नांची उकल करण्यासाठी व सर्वसामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्यासाठी समाजोपयोगी संशोधनाची नितांत गरज आहे. त्यासाठी अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी ही मोठी संधी आहे. - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू

Web Title: Future scientists will be created from the invention research competition - Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.