मराठी-गुजराती ड्रेसेसचे फ्युजन हिट! गरबा-दांडियासाठी तरुणाईची पसंती
By सीमा महांगडे | Updated: September 29, 2025 12:52 IST2025-09-29T12:51:19+5:302025-09-29T12:52:09+5:30
कवडी, आरसे, फायबरच्या चंदेरी मण्यांच्या दागिन्यांची क्रेझ

मराठी-गुजराती ड्रेसेसचे फ्युजन हिट! गरबा-दांडियासाठी तरुणाईची पसंती
सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दांडिया, गरबा प्रेमींनी ‘जरा हटके’ लूकसाठी पोशाखात विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा नेहमीची घागरा चोली किंवा चनिया चोली तर आहेच, पण त्याशिवाय गरब्यासाठी डिझाइन केलेले अनेक ट्रेंडी आउटफिटस्ही बाजारात आले आहेत.
गुजराती पोशाखाला महाराष्ट्रीय टच देत ट्रेंडी लुक आणण्याचा प्रयत्न तरुणाई करत आहे. त्यात ही नऊवारी घालून त्यावर शॉर्ट कुर्ती आणि चनिया चोलीवर नथीचा ट्रेंड अधिक भाव खाऊन जात आहे. डेनिम जॅकेट्स आणि डेनिम पँट्ची ही बरीच चलती यंदा दिसून येत आहे.
दागिन्यांच्या खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी होत आहे. भुलेश्वर बाजारात १५० रुपयांपासून ५३० रुपयांपर्यंत विविध दागिने उपलब्ध आहेत. कवडीपासून बनवलेले, आरसे लावलेले आणि फायबरच्या चंदेरी मण्यांपासून सजवलेले दागिने महिलांना आकर्षित करत आहेत.
६०० रुपयांत ऑक्सिडाइज्ड पेंडंट व रंगीत खडे असलेल्या माळा प्रति डझन दराने विकल्या जात आहेत; तसेच प्लास्टिकच्या, कवड्यांच्या दागिन्यांची ७२० रुपये प्रति डझन दराने विक्री होत आहे. लाकडापासून बनवलेले घुबड, ढोलकी, मोर असे पदक असलेले गळ्यातील दागिनेही लक्ष वेधून घेत आहेत.
हेअर ॲक्सेसरीज, आय मेकअपचा ट्रेंड
रंगीबेरंगी आयशॅडोज, रंगीत आयलाइनर व ग्लिटर बिंदींना जास्त पसंती मिळत असून नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार आय मेकअप ठरवणे हा ट्रेंड सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय ठरतोय. दिवसाच्या कार्यक्रमांसाठी हलकासा ग्लोइंग बेस व सौम्य लिपस्टिक शेड्स वापरल्या जात आहेत; तर रात्रीच्या दांडियासाठी बोल्ड रेड, मॅजेंटा किंवा डार्क वाइनसारख्या लिपकलर्सची मागणी आहे. मेटॅलिक हेअरपिन्स, स्टोन क्लिप्स, फ्लॉवर क्राऊन आणि मँगटिकासारख्या हेअर ॲक्सेसरीजनाही विशेष मागणी आहे. पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा मिलाफ साधणारे हे लुक्स तरुणाईच्या उत्साहात भर घालत आहेत.