जेव्हा पैशांसाठी पोलिसच अपहरण करतात...
By मनीषा म्हात्रे | Updated: March 30, 2026 05:37 IST2026-03-30T05:37:22+5:302026-03-30T05:37:22+5:30
'लाच दिल्याशिवाय काम होत नाही' ही मानसिकता समाजात खोलवर रुजली आहे.

जेव्हा पैशांसाठी पोलिसच अपहरण करतात...
मनीषा म्हात्रे
उपमुख्य उपसंपादक
कायद्याचे रक्षकच गुन्हेगार बनतात, तेव्हा समाजाच्या विश्वासाचा पाया हादरतो. जुहू परिसरात घडलेली अपहरण आणि लूट प्रकरण ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून, पोलिस यंत्रणेवरील नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारी गंभीर बाब आहे. परकीय चलन घेऊन निघालेल्या एका कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडील १० हजार अमेरिकन डॉलर लुटण्यात आले. या गुन्ह्यात दोन पोलिस शिपायांचा सहभाग उघड होणे ही बाब धक्कादायक आहे.
आरोपींनी नियोजनपूर्वक कर्मचाऱ्याला अडवले, जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि मारहाण करत त्याच्याकडील रक्कम हिसकावली. दहिसर परिसरात या कर्मचाऱ्याने धाडसाने आरडाओरडा केला, वाचवण्याची विनंती केली. एका प्रवाशाने ते दृश्य पाहून बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाठलाग करून कार अडवल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत या आरोपी पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक प्रकरणांत पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरण, खारमधील बनावट ड्रग्ज प्रकरण, लाचखोरी, खोट्या गुन्ह्यात अडकवणे यांसारख्या घटनांत अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. परंतु, अशा काही प्रकरणांमुळे संपूर्ण पोलिस यंत्रणेला दोष देणे योग्य नाही. मात्र, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण दलाची प्रतिमा खराब होते, हे दुःखद.
'महसूल' लाही लाचखोरीची कीड
सन २०२५ मध्ये महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची १६८ लाच प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडली. त्यात एकूण ६१ हजार रुपयांची लाच घेताना ते सापळ्यात अडकले. त्याखालोखाल पोलिस दलातील १२० प्रकरणे एसीबीने पकडली. त्यात ९१.२८ लाखांची लाच घेताना १७२ अधिकारी, अंमलदारांना अटक झाली.
एकेकाळी एसीबीच्या कारवायांमुळे प्रशासनात धाक निर्माण झाला होता. मात्र, कालांतराने ते कमी होत गेले. कारवायांची संख्या घटली; पण याचा अर्थ भ्रष्टाचार कमी झाला असा नाही. उलट, नागरिकांनीच लाच देणे ही 'सामान्य प्रक्रिया' मान्य केली आहे, ही चिंतेची बाब आहे. आज परिस्थिती अशी आहे की, अनेकांना लाच देणे हा गुन्हा वाटतच नाही. 'लाच दिल्याशिवाय काम होत नाही' ही मानसिकता समाजात खोलवर रुजली आहे. परिणामी, तक्रारी कमी झाल्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले. हीच मानसिकता बदलण्याची सर्वात मोठी गरज आहे.
अधिकारी सापळ्यात...
सप्टेंबर २०२५ वडाळा टी टी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना एसीबीने अटक केली होती. या दोघांनी गुन्हा न नोंदविण्यासाठी ५.५० लाखांची लाच मागितली होती. त्यातील काही रक्कम स्वीकारली. उर्वरित दोन लाख घेताना सरोदे यांना पकडण्यात आले. यानंतर पोलिस आयुक्तांनी दोघांना तातडीने निलंबित केले. तर महासंचालक कार्यालयाने दोघांना सेवेतून कमी केले.
मे २०२५: शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक बाबूराव देशमुख यांना एक लाखाची लाच घेताना पकडले. एका शैक्षणिक संस्थेत अज्ञातांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्याबाबत संस्थेने पोलिस तक्रार केली. शाळेला सुरक्षा पुरवण्यासह विरोधकांना अटक करण्यासाठी देशमुख यांनी तीन लाखांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता घेताना ते सापळ्यात अडकले.
लाचखोरीचा प्रश्न गंभीर
पोलिस दलातील लाचखोरीचा प्रश्न तर अधिकच गंभीर आहे. आकडेवारी पाहता, दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाचखोर अधिकारी पकडले जातात. महसूल विभाग आणि पोलिस दल लाचखोरीत पुढे आहे. वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वच जाळ्यात अडकतात. २ अलीकडे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही अटक करण्यात आली आहे. यावरून भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हे स्पष्ट होते. गेल्या महिन्यात लाच घेताना कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव तावडे यांच्यासह सहकारी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना अटक करण्यात आली. शासकीय कार्यालयातील त्यांच्या केबिनमध्ये ६.३४ लाखांची बेहिशोबी रोकडही सापडली.