चाळीमधून टॉवरमध्ये, समस्या मात्र चाळीसारख्याच; अपुरे पाणी, अस्वच्छतेमुळे वरळी BDDकर त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:07 IST2025-11-08T14:07:43+5:302025-11-08T14:07:43+5:30
पत्ता बदलताना अडचणी, सुरक्षारक्षकाअभावी दुसरेच करतात पार्किंग

चाळीमधून टॉवरमध्ये, समस्या मात्र चाळीसारख्याच; अपुरे पाणी, अस्वच्छतेमुळे वरळी BDDकर त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस फुटांच्या नव्या घरात राहण्यास गेले. मात्र, त्यांना घरांतून पाणी टपकणे, साफसफाई नसणे, निकृष्ट वायरिंग, डास आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव, अशा असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातही १५ दिवसांपासून २५६ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. थर्ड पार्टी करारानुसार नेमलेल्या कंत्राटदाराने पाठविलेल्या पाण्याच्या टँकरवर ते अवंलबून आहेत.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाने चाळ क्रमांक ८, ९, १०, ११, ३०, ३१ आणि ३६ मधील रहिवाशांना इमारत क्रमांक १ ‘डी’ विंगमध्ये सदनिका दिल्या आहेत. मात्र, येथेही समस्या भेडसावत असल्याने ते म्हाडाला पत्र देणार आहेत.
ड्रेनेज लाइन चोकअप होत असून, तक्रार करूनही सफाई होत नाही. डीसीसी कन्स्ट्रक्शनने मोकळ्या परिसरात एकदाच धूर फवारणी केली. कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशन पुरवण्यासाठी नाइट फ्रंटसोबत करार केला आहे; परंतु मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने तक्रारी सोडविल्या जात नाहीत.
निकृष्ट वायरिंगचा फटका
- निकृष्ट वायरिंगमुळे डोअर बेल, गिझर जळाले
- लिफ्टमधील व्हेंटिलेशन फॅन काम करत नाही.
- मुख्य प्रवेशद्वार वगळता उर्वरित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
- घराचे वॉटर प्रूफिंग केलेले नसल्यामुळे छतातून पाण्याची गळती होत आहे.
पत्ता बदलताना अडचणी
करारनाम्यात, वितरणपत्रासह ताबा पत्रामध्ये पूर्ण पत्ता नमूद नाही. त्यामुळे बँक खाते, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट कार्यालयात पत्ता बदलताना अडचणी येत आहेत, असे नवीन इमारतीमध्ये राहायला गेलेल्या रहिवाशांनी सांगितले.
सुरक्षारक्षकाअभावी दुसरेच करतात पार्किंग
स्वच्छता कंत्राटदाराकडे मनुष्यबळ नाही. त्यामुळे रहिवाशांनाच कचरा कुंडीमध्ये टाकावा लागत आहे. लिफ्ट, जिने, लॉबीमध्ये सफाई होत नाही. चाळ क्रमांक २५ आणि २६ मधील मोकळी जागा पार्किंगसाठी आहे. मात्र, येथे सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे रहिवासी सोडून अज्ञात व्यक्तींकडून पार्किंग केली जाते. परिणामी, पार्किंगसाठी जागा मिळत नाही. पार्किंगमध्ये चार्जिंग पाॅइंट नाहीत.
गेल्या १५ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. टँकरचे पाणी पिण्यायोग्य नाही. रहिवाशांना शुक्रवारी सायंकाळी बादलीने पाणी घरात भरावे लागत होते. महापालिकेने पिण्याचे पाणी पुरेशा दाबाने देण्याची गरज आहे.
-सुहास भोसले, रहिवासी
केवळ २५६ कुटुंबे नाही, तर नव्याने येणाऱ्या रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागू नये. आता पाणी, अस्वच्छता, पार्किंग, असे अनेक मुद्दे आहेत. म्हाडा आणि कंत्राटदार यांनी हे प्रश्न सोडविले पाहिजे. महापालिकेने पुरेसे पाणी दिले पाहिजे.
-सुरेश खोपकर, सल्लागार समिती