आमदार कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन; बालपणीच्या मित्रानेच लाखांमध्ये फसवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:47 IST2025-09-08T18:43:47+5:302025-09-08T18:47:57+5:30

मुंबईत बालपणीच्या मित्राने घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची प्रक्रिया समोर आली.

Friend cheated of Rs 35 lakhs on the pretext of providing a house from MLA quota | आमदार कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन; बालपणीच्या मित्रानेच लाखांमध्ये फसवलं

आमदार कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन; बालपणीच्या मित्रानेच लाखांमध्ये फसवलं

Mumbai Crime: बालपणीच्या मित्राने आमदार कोट्यातून कमी किमतीत म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून मीरारोड येथील ५५ वर्षीय डॉक्टरची ३५ लाख रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी संजय सिंह नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेत दादर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

डॉक्टरच्या तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. ते तीन वर्षापूर्वी प्रभादेवी येथे कुटुंबासह राहण्यास होते. त्यांची गोखले रोड परिसरात फार्मा कंपनी आहे. बालपणीचा मित्र असलेला संजय सिंह हा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्याची इंजिनिअरिंग टेक्नोकोर नावाची कंपनी आहे. त्याने त्याची म्हाडा, एसआरए, बीएमसी, पीडब्लूडी अशा शासकीय कार्यालयांत ओळख असल्याचे सांगून म्हाडाचे मंत्री किंवा आमदार कोट्यातील स्वस्त घर दादर परिसरात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. घर बाजारभावाप्रमाणे पावणे तीन कोटी रुपये किमतीचे असून आमदार कोट्यातून ते ८० लाख रुपयांत मिळवून देण्याची बतावणी केली.

सोडतीची फाइल मंत्रालयातून काढावी लागते. त्यासाठी रोख रक्कम द्यावी लागेल असे सांगून सुरुवातीला २० लाख रुपये घेतले. साहेबांना अजून पैसे द्यावे लागतील असे बोलून आणखी रोख १५ लाख घेतले. ऑगस्ट २०२१ मध्ये संजय आणखी १० लाखांची मागणी करू लागला.

तेव्हा घराची कागदपत्रे दाखवत नाही तोपर्यंत आणखी रक्कम देणार नाही, असे डॉक्टरांनी त्याला सांगितले. घर मिळत नसल्याने डॉक्टरांनी अधिक चौकशी केली असता, म्हाडाकडून अशा प्रकारे कोणत्याही कोट्यातून घरे विक्री केली जात नसल्याचे त्यांना समजले.

डॉक्टरांनी संजयकडे पैसे परत देण्याची मागणी केली. संजयने १५ लाखांचा धनादेश दिला. तो बाउन्स झाला. अखेर डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली.

Web Title: Friend cheated of Rs 35 lakhs on the pretext of providing a house from MLA quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.