पालिका रुग्णालयांत आता ताजे, पौष्टिक अन्न; १० रुग्णालयांसाठी योजना; रोज मिळणार विशेष आहार
By सीमा महांगडे | Updated: October 17, 2025 09:48 IST2025-10-17T09:48:00+5:302025-10-17T09:48:18+5:30
- सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेच्या दहा रुग्णालयांतील रुग्णांना पौष्टिक, नियोजित आणि त्यांच्या आजारानुसार विशेष आहार ...

पालिका रुग्णालयांत आता ताजे, पौष्टिक अन्न; १० रुग्णालयांसाठी योजना; रोज मिळणार विशेष आहार
- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या दहा रुग्णालयांतील रुग्णांना पौष्टिक, नियोजित आणि त्यांच्या आजारानुसार विशेष आहार मिळावा, यासाठी पालिकेने ‘शिजवलेल्या आहार पुरवठ्या’च्या नव्या करारासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत मधुमेह (डायबेटिक), उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मीठविरहित (सॉल्ट फ्री), मीठमर्यादित (सॉल्ट रेस्ट्रिक्टेड) आणि आरटी फीड (नळीमार्गे दिला जाणारा द्रव आहार) या प्रकारच्या विशेष आहाराचा पुरवठा रुग्णांना हाेणार आहे. या माध्यमातून दररोज १६०० रुग्णांना नाष्टा, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आणि चहा-बिस्कीट अशी सेवा पुरवली जाणार आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाच्या रुग्णसेवेसोबत चांगल्या दर्जाचा आणि पौष्टिक आहार मिळणार आहे.
या रुग्णालयांचा समावेश
एस. के. पाटील रुग्णालय (मालाड)
एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय (मालाड)
श्री हरिलाल भगवती रुग्णालय (बोरिवली)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (बोरिवली)
दिवाळीबेन मेहता (एमएए) रुग्णालय (चेंबूर)
पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय (गोवंडी)
सावरकर रुग्णालय (मुलुंड)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (कांदिवली)
राजावाडी रुग्णालय (घाटकोपर)
कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालय (चिंचपोकळी)
असा असणार आहार...
सकाळचा नाष्टा : साखरविरहित चहा, उपमा/पोहे/रवा/शिरा/दलिया, इडली चटणी, फळ (केळी/मोसंबी/सफरचंद)
दुपार रात्रीचे जेवण : भात, चपाती, डाळ/सांबार/कढी, भाजी (मूळभाज्या मर्यादित), उसळ/पनीर/सोया, दही, सलाड, चटणी
मीठमुक्त/मीठ-नियंत्रित आहार : जास्त मीठ, सुद्धा कांदा-लसूण मिश्रण, मेवा, मीठकट पदार्थ वर्ज्य
लिक्विड/आरटी-फीड : ज्या रुग्णांना चावता/खाता येत नाही, त्यांना ब्लेंडरमध्ये मिक्स अन्न (भात, डाळ, भाज्या, दूध, तेल, फळे) ५०० मिली प्रमाणात देणे.