‘एमएमआरडीए’चे घर देण्याच्या नावावर १० लाखांची फसवणूक! गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 13:29 IST2025-10-02T13:29:29+5:302025-10-02T13:29:51+5:30
एमएमआरडीएची दोन घरे स्वस्त दरात मिळवून देतो, असे सांगत अनाजी अहिरे याने १० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

‘एमएमआरडीए’चे घर देण्याच्या नावावर १० लाखांची फसवणूक! गुन्हा दाखल
मुंबई : एमएमआरडीएची दोन घरे स्वस्त दरात मिळवून देतो, असे सांगत अनाजी अहिरे याने १० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बापू सावंत (५२) यांनी दिंडोशी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी अहिरेवर गुन्हा नोंदवला आहे.
सावंत यांची त्यांच्याच सोसायटीतील दिनेश राणे (५२) यांच्या माध्यमातून अहिरेशी ओळख झाली. अहिरे हा विजया बँकेत नोकरी करत असून, रिअल इस्टेट व्यवसायातही सक्रिय असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अनेकांना गंडा घातल्याचे उघड
अहिरे याने तक्रारदाराला विद्याविहार येथील एमएमआरडीए प्रकल्पातील घर देतो, अशी बतावणी करत १० लाख रुपये मागितले. अहिरेने तीन ते चार महिन्यांत व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सावंत यांनी दोन घरांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम ताबा मिळाल्यानंतर देण्याचे ठरले.
गॅरंटी म्हणून अहिरेने प्रत्येकी पाच लाखांचे दोन चेकही दिले. त्यानंतर अहिरेने काही काळ एमएमआरडीएच्या यादीत तुमचे नाव लवकरच येईल, असे सांगत वेळ मारून नेली. मात्र, तीन महिने उलटून गेले तरीही घरे मिळाली नाहीत. बांधकाम विभागातील पवार नावाच्या व्यक्तीशी फोनवर बोलणे करून दिले. परंतु, भेटण्यास टाळाटाळ केली गेली. सावंत यांनी अहिरेच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांना इतरांनाही गंडा घातल्याचे समजले.