‘त्या’ बँक खात्यातून तब्बल ५१३ कोटींचे व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:33 IST2025-10-28T09:33:50+5:302025-10-28T09:33:50+5:30
सायबर महाराष्ट्रने याप्रकरणी शुक्रवारी मुंबई, राजस्थान आणि म्हैसूर येथून आणखी सहा संशयितांना अटक केली

‘त्या’ बँक खात्यातून तब्बल ५१३ कोटींचे व्यवहार
मुंबई : वृद्ध दाम्पत्याला तब्बल ४० दिवस डिजिटल अटकेत ठेवून ५८ कोटी रुपयांची लूट करणाऱ्या टोळीच्या कारवायांचे नवे धागेदोरे सायबर महाराष्ट्रच्या तपासातून समोर आले. या गुन्ह्यात वापरलेल्या परदेशी बँक खात्यावर अवघ्या १४ महिन्यांत तब्बल ५१३ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
सायबर महाराष्ट्रने याप्रकरणी शुक्रवारी मुंबई, राजस्थान आणि म्हैसूर येथून आणखी सहा संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे अटक आरोपींची संख्या १३ झाली आहे. यामध्ये नव्याने अटक झालेल्यांमध्ये प्रभादेवीतील व्यापारी मुकेश भाटिया (६६) यांचा समावेश आहे. त्यांनी ‘टेक्नोमिस्ट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या नावाने इंडोनेशियातील बँकेत खाते उघडले होते. या खात्यातून गेल्या १४ महिन्यांत ५१३ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. या व्यवहारांमागे अटक आरोपी सनी लोढा (३२) आणि त्याच्या साथीदारांचा हात असल्याचे उघड झाले आहे. लोढाने वृद्ध दाम्पत्याकडून उकळलेली रक्कम क्रिप्टो करन्सीद्वारे परदेशात पाठवली असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
भारताबाहेरील काही जणांचा सहभाग?
सायबर पोलिसांच्या मते, या आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटमध्ये भारताबाहेरील काही जणांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे. आरोपींनी आभासी अटक, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल चलन व्यवहार या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा परदेशात हलवला असल्याचा संशय आहे. या गुन्ह्याशी संबंधित आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.