मुंब्रा, शिळ, कळवासोबतच मालेगावातील चार उपविभागात वीजग्राहकांच्या सेवेसाठी फ्रॅन्चायझी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:35 IST2020-02-29T18:32:58+5:302020-02-29T18:35:01+5:30
फ्रॅन्चायझीकरिता देण्यात आलेल्या विभागातील वीजग्राहक हे महावितरणचेच ग्राहक राहणार असून राज्यातील इतर ग्राहकांना लागू असणाऱ्या व मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ठरवनू दिलेल्या प्रचलित वीजदरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

मुंब्रा, शिळ, कळवासोबतच मालेगावातील चार उपविभागात वीजग्राहकांच्या सेवेसाठी फ्रॅन्चायझी
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, शिळ व कळवा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर उपविभाग क्रं. एक, दोन व तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागातील वीजग्राहकांना तत्पर व ऊच्च दर्जाची सेवा मिळावी, यासाठी फ्रॅन्चायझीची नेमणूक करण्यात आली असून १ मार्च २०२० च्या मध्यरात्रीपासून फ्रॅन्चायझीद्वारे येथील ग्राहकांना वीजसेवा देण्यात येणार आहे.
मुंब्रा, शिळ व कळवा या विभागासाठी मे.टॉरेंट पॉवर तर मालेगाव शहरातील उपविभाग क्रं.एक,दोन व तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागात येणारे भायेगाव, सायनी, दरेगाव, मालदे आणि द्याने या गावांसाठी कोलकाता इलेक्ट्रीक सप्लाय कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांची फ्रॅन्चायझी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
फ्रॅन्चायझीकरिता देण्यात आलेल्या विभागातील वीजग्राहक हे महावितरणचेच ग्राहक राहणार असून राज्यातील इतर ग्राहकांना लागू असणाऱ्या व मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ठरवनू दिलेल्या प्रचलित वीजदरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या विभागातील ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा देण्याकरिता कोणत्याही प्रकारची अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही.
येथील ग्राहकांच्या विजेशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. या केंद्राकडून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण न झाल्यास महावितरणद्वारे स्थापन करण्यात आलेल्या नोडल ऑफीसच्या माध्यमातून या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. विद्युत कायदा २००३ च्या नुसार देण्यात आलेले सर्व अधिकार या विभागातील ग्राहकांकरिता अबाधित राहतील.
या सर्व विभागातील वीजग्राहकांनी वीजदर, वीजसेवा व इतर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारची शंका असल्यास महावितरणच्या नोडल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवहन महावितरणने केले आहे.