चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 08:18 IST2025-11-02T08:16:07+5:302025-11-02T08:18:44+5:30
महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी १ जुलैपासून नवीन वीजदर रचना लागू झाली आहे.

चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीजवापर वाढविण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना राबविल्यामुळे राज्यातील चार हजार १६४ ग्राहकांनी एक महिन्यात २२ मेगावॅट क्षमता वाढवून घेतली. यामध्ये २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचा समावेश असून, दिवाळीपूर्वी मागणीनुसार उत्पादन वाढविण्यास त्यांना मदत झाली.
महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी १ जुलैपासून नवीन वीजदर रचना लागू झाली आहे. प्रथमच सर्व प्रवर्गातील वीज ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरासाठी दरामध्ये अतिरिक्त सवलतही देण्यात येत आहे. त्याचा लाभ घेऊन अनेक वीज ग्राहकांचा वीज वापर वाढला आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या कनेक्शनसाठीचा भार वाढवून घेणे उपयुक्त ठरत आहे. ग्राहकांना कनेक्शन देताना त्यांच्या मागणीनुसार वीज वापराबाबतची क्षमता निश्चित केली जाते, त्याला मंजूर भार म्हणतात.
सर्वाधिक औद्योगिक वीज ग्राहकांचा सहभाग
महावितरणने ही सुविधा २६ सप्टेंबरला सुरू केली. महिनाभरात राज्यातील ४ हजार १६४ ग्राहकांनी नव्या सुविधेचा लाभ घेतला. सर्वाधिक २ हजार ४६० औद्योगिक वीज ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांची संख्या ९४२ असून, ५०९ व्यावसायिक ग्राहकांनी सुविधेचा लाभ घेतला. याखेरीज २५३ अन्य ग्राहकांनाही लाभ झाला.
‘इज ऑफ लिव्हिंग’च्या सूत्रानुसार ग्राहकांसाठी मंजूर भार वाढविण्यासाठी (लोड एनहान्समेंट) स्वयंचलित व्यवस्था सुरू केली. योजनेमध्ये ग्राहक घरबसल्या मोबाइल ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटवर अर्ज सादर करून शुल्क भरून मंजूर भार वाढवून घेऊ शकतात. शुल्क भरल्यानंतर ४८ तासांत त्याला परवानगी असलेला मंजूर भार वाढवून दिला जातो.
- लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण