मुंबई : कोकणातून मुंबई दर्शनासाठी आलेल्या सागर चव्हाण (२३), साईप्रसाद चव्हाण (१७), मनोज चव्हाण (१७) आणि दत्तप्रसाद चव्हाण (२०) या ४ भावंडांचा रेल्वे रूळ ओलांडताना सोमवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साईप्रसाद, मनोज आणि दत्तप्रसाद हे रेल्वेने दादरला आले होते. त्यांना घेण्यासाठी चुलतभाऊ सागर दादरला आला होता. सागरसह तिघांनी दादर येथून बोरीवलीला जाण्यासाठी लोकल पकडली.लोकल कांदिवली-बोरीवली स्थानकांदरम्यान पोईसर येथे सिग्नलवर थांबली. त्याचवेळी चौघांनी लोकलमधून रेल्वे रुळावर उड्या मारल्या, मात्र सिग्नल मिळाल्यामुळे त्यांची लोकल निघून गेली. त्यानंतर रेल्वे रूळ ओलांडताना चर्चगेटला जाणाऱ्या लोकलने त्यांना उडविले. अपघातात चार तरुण जखमी झाल्याचे साडेपाचच्या सुमारास बोरीवली रेल्वे पोलिसांना समजले.जखमी तरुणांना स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षामध्ये आणण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला, असे सहायक पोलीस निरीक्षक आर.जे. भिसे यांनी सांगितले. दत्तप्रसादचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाले होते. मनोज, साईप्रसाद यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
बोरिवलीजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना चार भावांना ट्रेनने उडवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 07:07 IST