ठाणे-बोरीवली भुयारीकरण सुरू होण्यासाठी चार महिने; टीबीएमच्या जुळणीला चार महिन्यांचा अवधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:09 IST2025-11-05T14:08:24+5:302025-11-05T14:09:20+5:30
प्रकल्पाच्या कामाला विलंब झाल्याने त्याची मे २०२८ मधील डेडलाइन हुकणार

ठाणे-बोरीवली भुयारीकरण सुरू होण्यासाठी चार महिने; टीबीएमच्या जुळणीला चार महिन्यांचा अवधी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ठाणे-बोरीवली प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करून दोन वर्ष उलटल्यानंतरही अद्याप या प्रकल्पाचे भुयारीकरण सुरू झाले नाही. या प्रकल्पाचे पहिले टीबीएम ठाण्यात दाखल झाले असले तरी त्याची जुळणी होऊन प्रत्यक्ष भुयारीकरण सुरू होण्यासाठी अजून चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यातून भुयारीकरण सुरू होण्यासाठी मार्च उजाडणार असून, प्रकल्पाच्या कामाला विलंब झाल्याने त्याची मे २०२८ मधील डेडलाइन हुकणार आहे.
ठाणे बोरीवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ११.८४ किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी एमएमआरडीए करणार आहे. या प्रकल्पात १०.८ किमी लांबीच्या दोन जुळ्या बोगद्यांचा समावेश असून, त्यासाठी १८,८३८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एमएमआरडीएने मेघा इंजिनिअरिंगला जून २०२३ मध्ये प्रकल्पाचे काम दिले. भूसंपादनाच्या तिढ्यात या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता ठाणे बाजूकडील भुयारीकरणासाठी जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. कंत्राटदाराने नायक हे २५०० टन वजनाचे टीबीएम ३०० ट्रकद्वारे मुंबईत आणले आहे. या टीबीएमची ठाण्यात प्रकल्पस्थळी जुळणी सुरू असून, हे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्चमध्ये भुयारीकरण सुरू होईल.
चार टीबीएमच्या साहाय्याने भुयारीकरण केले जाणार आहे. मागाठाणे येथून सुरू होणाऱ्या भुयारीकरणासाठी जमीन अद्यापही एमएमआरडीएच्या ताब्यात आली नाही. या जमिनीचा ताबा मिळल्यानंतरही भुयारीकरण सुरू होण्यासाठी अजून वर्ष उलटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुयारीकरण सुरू होण्यासाठी २०२७ उजाडू शकते.