यंदा चार लाख विद्यार्थी देणार ‘पॅट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:38 IST2025-10-08T10:38:40+5:302025-10-08T10:38:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई जिल्ह्यातील सर्व माध्यमातील शाळांमधील पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी पॅट अर्थात परफॉर्मन्स असेसमेंट ...

यंदा चार लाख विद्यार्थी देणार ‘पॅट’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई जिल्ह्यातील सर्व माध्यमातील शाळांमधील पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी पॅट अर्थात परफॉर्मन्स असेसमेंट टेस्ट ही परीक्षा १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मुंबई महापालिका आणि विभागीय शिक्षण उपसंचालक अंतर्गत ३ हजार शाळांमधील सुमारे ४ लाख विद्यार्थी सहभागी होणार असून, शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केल्याचा दावा केला आहे. परंतु, इतक्या कमी कालावधीत परीक्षेच्यावेळी पुरेशा प्रश्नपत्रिका मिळणार का, असा सवाल शिक्षकांनी केला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचे मूल्यमापन करणे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे, शिक्षणात येणाऱ्या अडचणी समजून घेणे, हा या पॅट परीक्षेमागचा उद्देश आहे. या परीक्षेद्वारे भाषिक कौशल्य, गणितीय तर्कशक्ती, वाचन आणि लेखन क्षमता चाचणी घेतली जाणार आहे.
शिक्षण विभाग काटेकाेर नियाेजन करणार
मुंबई शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रश्नपत्रिका वेळेवर शाळांपर्यंत पोहोचतील यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षा शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळांमध्ये परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबर रोजी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या असून मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिका एक-दोन दिवसांत मिळतील अशी अपेक्षा मुख्याध्यापक हेमलता गावित यांनी व्यक्त केली.
पुरेशा प्रश्नपत्रिका प्रत्येक शाळांना दिल्या जाणार आहेत. त्याबाबतचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांना प्रश्नपत्रिका वेळेत पोहचविल्या जात आहेत.
वैशाली वीर, शिक्षण निरीक्षक, मुंबई
यावेळी प्रश्नपत्रिका पुरेशा संख्येने पोचण्याचे नियोजन केलेले दिसते. या दोन दिवसातच शाळांना प्रश्नपत्रिका मिळणे सुरू झाले आहे.
संजय पाटील, मुख्याध्यापक विद्याभूषण हायस्कूल, दहिसर