Join us

एकाच खोलीत चार बालवाड्या, दर्जेदार शिक्षणात अडथळे, महापालिकेच्या शिक्षण विभागाचे होतेय दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:09 IST

मुंबई : महापालिका अनेक शाळांमध्ये एकाच वर्ग खोलीत चार बालवाड्या भरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडथळा येत ...

मुंबई : महापालिका अनेक शाळांमध्ये एकाच वर्ग खोलीत चार बालवाड्या भरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडथळा येत आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जाणकारांकडून होत आहे. दरम्यान, याबाबत योग्य पडताळणी करू, असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे.

पालिकेने २००७-८ पासून बालवाड्या सुरू केल्या. सध्या ९०० बालवाड्यांमध्ये  २५ हजारांपेक्षा अधिक मुले मोफत शिक्षण घेत आहेत. केंद्र शासनाच्या २०१३ च्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी धोरणानुसार प्रत्येक बालवाडीसाठी २० पेक्षा अधिक बालके नसावीत, असे नमूद आहे. मात्र, पालिकेच्या एका बालवाडीसाठी कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ४० विद्यार्थी, असे निकष आहेत. हे केंद्र शासनाच्या धोरणाच्या विसंगत आहे, असे श्रमिक भारतीय युनियन संघटनेचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

भांडुप पश्चिमेतील म. वि. रा. शिंदे पालिका शाळेत तळमजल्यावर एकाच खोलीमध्ये चार बालवाड्या सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीस पाहणीत आढळले. एकाच खोलीत चार बालवाड्या भरवल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात अडथळा येतो. तसेच खेळणी ठेवण्यासाठी बालवाड्यांमध्ये कपाटे नाहीत, असे जाधव यांनी सांगितले.

कुर्ला पश्चिमेतील बर्वेनगर पालिका  शाळेच्या तळमजल्यावर एकाच वर्ग खोलीत जुनियर व सिनियर केजी, नर्सरी आणि बालवाडीच्या मिळून ५४ बालकांना एकाच खोलीत बसवले जात असल्याचेही आढळले. तर, घाटकोपर येथील पंतनगर पालिका शाळेत तळमजल्यावर बालवाडीचे वर्ग भरविण्याऐवजी तिसऱ्या मजल्यावर हे वर्ग भरविले जातात, असे शिक्षक विकास घुगे यांनी सांगितले.

एकाच खोलीत चार बालवाड्या भरवण्यासंदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, त्याची आम्ही पडताळणी करू.  किमान २० ते जास्तीतजास्त ४० बालके एका बालवाडीत असावीत. बालकांना मोफत शिक्षण मिळावे, हे पालिकेचे धोरण आहे, असे शिक्षण विभागाच्या उपायुक्त प्राची जांभेकर म्हणाल्या.

टॅग्स :शाळामुंबई