कांदिवली लसीकरण घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:59 AM2021-06-19T07:59:38+5:302021-06-19T07:59:51+5:30

गुन्हा दाखल; बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्रांद्वारे सुरू होते लसीकरण

Four arrested so far in Kandivali vaccination scam | कांदिवली लसीकरण घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक

कांदिवली लसीकरण घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत झालेल्या लसीकरण घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांंना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, लसीकरणासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, शिवाय हे लसीकरण डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आले 
नव्हते. यावेळी लोकांना देण्यात आलेल्या लसींच्या वैधतेबाबत अधिक तपास सुरू असून, पोलिसांना पालिकेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी सोसायटीतील एकूण ३९० सभासदांनी लस घेतली. प्रत्येकाने १ हजार २६० रुपये प्रति दराने एकूण ४ लाख ५६ हजार रुपये आयोजकांना दिले होते. लसीकरण झाल्यानंतर सोसायटीतील सदस्यांनी प्रमाणपत्राबाबत मागणी करताच, सदस्यांना तीन वेगवेगळ्या संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवीत अधिक तपास सुरू केला आहे.

चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, या लसीकरणासाठी महानगरपालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच कोणतेही वैद्यकीय अधिकारी यावेळी हजर नव्हते. देण्यात आलेल्या लसी मान्यताप्राप्त संस्थेकडून विकत घेतल्या नसल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार जणांंना अटक करण्यात आली आहे. यातील करीम अकबर अली (२१) हा मध्यप्रदेश येथून हे व्हॅक्सिन घेऊन येत होता. त्यालाही ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
यातील मुख्य आरोपी असलेल्या महेंद्र सिंह (३९) याच्याकडून ९ लाख रुपये जप्त करण्यात आले. तो दहावी नापास आहे, तर सोसायट्यांमध्ये कॅम्प लावण्याची जबाबदारी 
संजय गुप्ता (२९) याच्यावर होती. त्यांचे साथीदार असलेले चंदन सिंह (३२) आणि नितीन वसंत मोंडे (३२) हे दोघे विविध हॉस्पिटलचे आयडी चोरी करून बनावट प्रमाणपत्र तयार करीत होते. या चौघांकडेेही पाेलीस अधिक तपास करीत आहेत. 

वर्सोवा पोलीस ठाण्यातही तक्रार
या रॅकेटविरुद्ध आणखी एक तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल आहे. मॅचबॉक्स पिक्चर्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना याच रॅकेटकडून लस दिल्याच्या कथित आरोपांविरुद्ध ही तक्रार दाखल आहे. याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून प्राथमिक तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींचा तपास सुरू आहे.

तुमचीही फसवणूक झाल्यास साधा संपर्क !
या टोळीने मुंबईतल्या विविध ठिकाणी अशाप्रकारे फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. तुमचीही अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Web Title: Four arrested so far in Kandivali vaccination scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.