Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची पुन्हा चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 05:37 IST

उदय सामंत यांची घोषणा; नॅक मूल्यांकनावेळच्या कामात गैरव्यवहार

मुंबई : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नॅक मूल्यांकनावेळी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची उपसचिवांमार्फत चौकशी केली जाईल. तसेच ३० दिवसांत चौकशी पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.

प्रश्नोत्तराच्या तासात विक्रम काळे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. २०१९ मध्ये डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन करण्यात आले. यावेळी मूल्यांकनासाठी २२ विभागातील डागडुजीच्या कामासाठी आठ कोटींचा खर्च केला गेला. या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याच्या चौकशीसाठी विद्यापीठाने पाटील समिती नियुक्त केली होती. त्यात तत्कालीन कुलगुरू चोपडे आणि विद्यापीठाचा एक प्रशासकीय अधिकारी दोषी आढळले आहेत. समितीने कुलगुरूंसह दोघांवर तब्बल १६ दोषारोप ठेवले आहेत. दरम्यान चोपडे निवृत्त झाले. आता निवृत्त कुलगुरूंवर काय कारवाई करावी, असे विधि व न्याय विभागाला विचारले आहे. विभागाकडून अभिप्राय आल्यानंतर माजी कुलगुरु चोपडे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.पवित्र पोर्टलमध्ये दुरूस्ती

पवित्र पोर्टलमध्ये कला, क्रीडा व कायार्नुभव शिक्षक भरती प्रकरणी तरतूद नाही. मात्र त्यासंदर्भात पोर्टलमध्ये दुरूस्ती करण्यात यईल, अशी माहिती कडू यांनी दत्तात्रय सावंत यांच्या एका तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली.शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढशिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडून विभागाला प्राप्त झाला आहे. त्यावर कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. लवकरच शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रीकांत देशपांडे यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिले.तपासणीनंतरच विशेष शिक्षकांचे समायोजनअपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) या योजनेतील कार्यरत असलेले कोणते विशेष शिक्षक समायोजनासाठी पात्र आहेत, हे निश्चित करूनच त्यांचे समायोजन करण्यात येईल, अशी माहिती कडू यांनी ना. गो. गाणार यांच्या एका तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पथक नेमण्यात आले आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादउदय सामंत