मुंबई : वसई-विरार परिसरात मलनिस्सारण आणि डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या ६० एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतींप्रकरणी वसई-विरार महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना ईडीने बुधवारी अटक केली.
ईडीने ४ ऑगस्टला पवार यांच्यासह त्यांच्या पत्नीची दहा तास चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा पवार यांची दोन वेळा स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली होती. बुधवारी झालेल्या चौकशीनंतर अनिलकुमार पवार यांच्यासह नगर रचनाकार वाय. एस. रेड्डी या बांधकाम प्रकरणातील मुख्य सूत्रधार सीताराम गुप्ता, त्याचा मुलगा अरुण गुप्ता यांना अटक करण्यात आली.
यापूर्वी इतरांकडे सापडलेले घबाड
ईडीने यापूर्वी या प्रकरणात गुंतलेल्या लोकांवर केलेल्या छापेमारीत ८ कोटी ९४ लाख रुपयांची रोख रक्कम, २३ कोटी २५ लाख रुपये मूल्याचे हिरे व सोन्याचे दागिने, १३ कोटी ८६ लाख रुपये मूल्याचे शेअर्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, बँकेत जमा असलेल्या ठेवी जप्त केल्या आहेत.
छापेमारीत आढळली रोकड
२९ जुलै रोजी ईडीने अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापेमारी केली. नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी १ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड आढळली होती. नातेवाइकांच्या नावे, तसेच बेनामी मालमत्तेची कागदपत्रेही आढळली होती.
काय आहे ठपका?
वसई-विरार परिसरातील बांधकामात अनिलकुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. या प्रकरणात त्यांनी प्रति चौरस फूट २० ते २५ रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात आढळले. तर, वाय. एस. रेड्डी या तत्कालीन नगर रचनाकाराने प्रति चौरस फूट १० रुपये दराने ४१ इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. कनिष्ठ अभियंते, वास्तुविशारद, सनदी लेखापाल, अनेक एजंट देखील या प्रकरणात सामील आहेत. याप्रकरणी मीरा-भाईंदर पोलिसांत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.