Former MP Raju Shetty has warned maharashtra vikas aghadi goverment and mahavitran | "हिंमत असेल तर वीजपुरवठा खंडित करुन दाखवा; आम्ही सरकारविरुद्ध दोन हात करायला तयार"

"हिंमत असेल तर वीजपुरवठा खंडित करुन दाखवा; आम्ही सरकारविरुद्ध दोन हात करायला तयार"

मुंबई : डिसेंबरअखेर राज्यात ६३ हजार ७४० कोटी थकबाकी असून, आता जर ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे महावितरणने म्हटले आहे. परिणामी वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले. महावितरणाच्या या धोरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट इशाराच दिला आहे. 

राजू शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं होतं. मात्र हे आश्वासन पुन्हा मागे घेण्यात आलं. राज्य सरकारने लाईट बिल माफ केले पाहिजे, असं राजू शेट्टी यांनी सांगितले. 

राजू शेट्टी यांनी महावितरणाला देखील इशारा दिला आहे. हिंमत असेल तर महावितरणने घरगुती कनेक्शन तोडून दाखवावे. त्यांना आमच्या परीने उत्तर देऊ, असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. तसेच सरकारशी दोन हात करण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत. मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, कोरोनामुळे काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबरअखेरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या. डिसेंबरअखेर कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी थकबाकी आहे. वाणिज्यिक, घरगुती, औद्याेगिक ग्राहकांकडे ८ हजार ४८५ कोटी व उच्चदाब ग्राहकांकडे २ हजार ४३५ कोटी थकबाकी आहे. थकबाकीचा डोंगर वाढल्याने थकबाकी वसुलीसाठी जानेवारीपासून मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. ग्राहकांना वीजबिल हप्त्यामध्ये भरण्याची सवलत आहे. थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारने वीजबिल वसुली सुरु- फडणवीस

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे सरकारने वीजबिल वसुली सुरु केली आहे. राज्य सरकारने हजारो कोटींची सुट बिल्डर्संना दिलेली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सामान्य लोकांकडे रोजगार नव्हता.  अशाववेळी सामान्य लोकांचे  ४ पट जास्त अलेले बिलं हे सुधरवण्याची गरज होती. मात्र असं न करता थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचं काम सरकारकडून करण्यात येत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मनसेनंही घेतली होती आक्रमक भूमिका

राज्यातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी मनसेकडून जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाही काढण्यात आला होता. यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचं नमूद केलं होतं. वाढीव वीजबिल माफ केलं जात नाही तोवर राज्यातील जनतेने वीजबिल भरू नये, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं होतं. याशिवाय, वीजबिल न भरल्यामुळे कुणी वीज जोडणी कापण्यास आलं तर त्यांच्या कानाखाली 'शॉक' देऊ असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केलं होतं. 

'महावितरण'चं म्हणणं काय?

लॉकडाऊनच्या काळात खासगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसुल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण होत आहे, असं महावितरणने जाहीर केलं आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Former MP Raju Shetty has warned maharashtra vikas aghadi goverment and mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.