Join us  

"...म्हणून ठाकरे सरकारने अधिवेशन संपल्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना समोर आणलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 1:30 PM

Anvay Naik Case: ठाकरे कुटुंब पार्टनरशिप घेऊन सीडीआरदेत नाही ही खंत कदाचित नाईक कुटुंबाची आहे, असा दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे. 

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण विधीमंडळात गाजल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणदेखील पुन्हा चर्चेत आलं होतं. अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. मागील सरकारने वडिलांचं (अन्वय नाईक) आत्महत्या प्रकरण दाबलं असल्याचा पुन्हा आरोप केला. तर माझ्या पतीच्या आत्महत्येचं प्रकरण बाजूला राहिलं विरोधक त्यांच्या जमीन व्यवहारांवर चर्चा करत आहेत, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर जिलेटिननं भरलेली गाडी सापडल्यावर विधानसभेत आक्रमक होणारा, गदारोळ करणारा पक्ष आमच्या प्रकरणात शांत का?, असा सवाल नाईक मायलेकींनी उपस्थित केला. मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून सीडीआर काढणारे आमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करत आहेत? गुन्ह्यातील आरोपी तुमचे नातेवाईक आहेत का? न्याय केवळ श्रीमंतांनाच मिळणार का, असे अनेक प्रश्न अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी विचारले आहेत. 

अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी फडणवीस सरकारवर आरोप केल्यानंतर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणे म्हणाले की, ठाकरे सरकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहात उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर नाईक कुटुंबाला समोर आणलं आहे. देवेंद्र फडणवीस पूर्ण राज्य सरकारला पुरुन उरले. तसेच ठाकरे कुटुंबाचे पार्टनर नाईकांना अचानक सीडीआर पाहिजे. ठाकरे कुटुंब पार्टनरशिप घेऊन सीडीआर देत नाही ही खंत कदाचित नाईक कुटुंबाची आहे, असा दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे. 

दरम्यान, अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ अन्वय नाईक यांनी उभारून दिला. त्याचे पैसे थकवल्यानं, गोस्वामींनी धमक्या दिल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाला ३ वर्ष उलटूनही अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र पोलिसांचं तोंड काळं झालं असं फडणवीस म्हणतात. असं बोलणं फडणवीस यांना शोभतं का, असा प्रश्न नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केला.

गेल्या सरकारनं अन्वय नाईक प्रकरण दाबल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. गेल्या सरकारमध्ये आरोपींना अटकदेखील झाली नव्हती. आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. आरोपींना इतकी स्पेशल ट्रिटमेंट कशी दिली आणि ती त्यावेळी कोणाच्या आदेशावरून दिली गेली, असे सवाल विचारत अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी अप्रत्यक्षपणे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत? 

आम्हाला धमक्या येत आहेत. प्रभादेवीमध्ये मारणार, बघतोच तुझा व्यवसाय होतो, आताच कुठे खेळ सुरू झालाय, अशा धमक्या दिल्या जात आहेत. हे प्रकरण दाबलं हे नक्की मात्र त्याची चौकशी करावी. मागील सरकारची पूर्णपणे चौकशी व्हायलाच हवी, असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं. 

टॅग्स :अन्वय नाईकमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीनिलेश राणे भाजपादेवेंद्र फडणवीस