Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:23 IST

विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश नावंदर यांनी २८ नोव्हेंबर रोजी आरोप निश्चित केले. कदम आणि त्याचे सहकारी यांनी  ‘साहित्यारत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’मधून ३१३ कोटी रुपये वळते  केल्याचा आरोप आहे.

मुंबई : सरकारी महामंडळातील ३०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांसह नऊ जणांवर आरोप निश्चित केले.

विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश नावंदर यांनी २८ नोव्हेंबर रोजी आरोप निश्चित केले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार आहे. 

कदम आणि त्याचे सहकारी यांनी  ‘साहित्यारत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’मधून ३१३ कोटी रुपये वळते  केल्याचा आरोप आहे. ही रक्कम राज्यातील मातंग समाजाच्या उन्नतीसाठी दिली जाणार होती.

न्यायालयाने आदेशात नेमके काय म्हटले?

सरकारने १९८५ मध्ये मातंग समाजातील गरिबीरेषेखालील कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एसएलएएसडीसीची स्थापना केली. हे महामंडळ  केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांखाली आर्थिक तरतूद केली जाते.

कदम यांनी २०१२ ते २०१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना व्यवस्थापकीय संचालकांना केवळ ‘रबर स्टॅम्प’ बनवून नियमित प्रक्रिया डावलून स्वत: प्रत्यक्ष हुकूमशहाप्रमाणे काम केले, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. 

गरिबीरेषेखालील लोकांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी असलेली निधीची रक्कम कदम यांच्या निकटवर्तीय व नातेवाईकांच्या नावाने बनवलेल्या बनावट संस्थांकडे वळवण्यात आली. त्यानंतर त्या निधीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी मालमत्ता आणि व्यावसायिक कंपन्या खरेदी करण्यासाठी करण्यात आला, असे आदेशात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-MLA Kadam indicted in money laundering case; trial begins.

Web Summary : Ex-MLA Ramesh Kadam and eight others are indicted in a 300-crore money laundering case related to the Annabhau Sathe Development Corporation. Funds meant for the Matang community were allegedly diverted for personal gain, leading to trial.
टॅग्स :रमेश कदमभ्रष्टाचारअंमलबजावणी संचालनालयन्यायालय