Join us  

महाडेश्वरांवर फुटकळ कारवाईनं भागणार नाही; क्राईम ब्रांचकडून चौकशी व्हावी, भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 7:15 PM

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. 

महाडेश्वर यांच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे नसल्याचं समजतं. त्यामुळे थोड्याच वेळात महाडेश्वर यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधत एक महत्वाची मागणी केली आहे. 

महाडेश्वर यांच्यावर फुटकळ कारवाई करून भागणार नाही, या संपूर्ण प्रकरणाची क्राईम ब्रांचच्यावतीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच हा हल्लाच नाही, असे म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही माफी मागितली पाहिजे, असं अतुल भातखळकर ट्विटरद्वारे म्हणाले. 

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या चार माजी नगरसेवकांना अटक झाली आहे. दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी अलीम यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांच्याविरोधात जामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. 

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले आहेत. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली. या हल्ल्याप्रकरणी माजी  महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली आहे.

टॅग्स :किरीट सोमय्याविश्वनाथ महाडेश्वरशिवसेनाभाजपापोलिस