विनयभंग प्रकरणातील आरोपी उपमहानिरीक्षक मोरे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:16 IST2020-01-10T06:16:28+5:302020-01-10T06:16:35+5:30
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपी असलेले पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले.

विनयभंग प्रकरणातील आरोपी उपमहानिरीक्षक मोरे निलंबित
मुंबई/पनवेल : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपी असलेले पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. मोरे यांच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळला. डीआयजी मोरे यांनी नवी मुंबईतील विकासकाकडून घेतलेल्या गाळ्याचे पैसे न दिल्याने पोलिसांत तक्रार दाखल आहे. त्या विकासकाच्या १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाला मोरे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी मुलीच्या अंगाला केक लावून अश्लील वर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, ही बेपत्ता असलेली मुलगी उत्तर प्रदेशात असल्याचे उघड झाले. मात्र त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही.
>त्या चालकाची चौकशी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय ताफ्यात वाहनचालक असलेला दिनकर साळवे याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकीचे फोन केले, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. साळवे त्या मुलीच्या घरी गेला होता का, त्याचे निशिकांत मोरेंशी काय संबंध आहेत याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. साळवे दोषी आढळल्यास त्याला निलंबित केले जाईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.