Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:34 IST2025-09-22T13:33:07+5:302025-09-22T13:34:13+5:30
दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रूपात मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला.

Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रूपात मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. तब्बल दीड वर्षांच्या नूतनीकरणानंतर, आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखान्याचे लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्याला सचिन तेंडुलकर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९०९ साली स्थापन झालेला हा जिमखाना मुंबईतील एक प्रमुख ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. या नूतनीकरणामुळे हा जिमखाना आता मुंबईकरांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र बनणार आहे.
दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी जिमखान्याला 'ऑक्युपेशन सर्टिफिकेट' मिळाल्यानंतर, अवघ्या तीन दिवसांत ३,००० हून अधिक सदस्यांसाठी त्याचे दरवाजे उघडले गेले. या जिमखान्याला भारतीय क्रिकेटची 'नर्सरी' मानले जाते आणि येथील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे या जिमखान्याशी विशेष नाते आहे. याच ठिकाणी त्यांनी महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती.
सचिन तेंडुलकर काय म्हणाले?
जिमखान्याच्या नूतनीकरणानंतर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. "मला आठवतं, मी माझं बालपण इथेच घालवलं, असे त्यांनी भावूक उद्गार त्यांनी काढले. तसेच त्यांनी नूतनीकरणात योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले की, "या जिमखान्याला पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आणण्यासाठी अनेक लोकांनी खूप मेहनत घेतली आहे." तेंडुलकर यांनी विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या योगदानाचे कौतुक केले. "राज ठाकरे यांची या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केवळ आवश्यक परवानग्या मिळवण्यासच मदत केली नाही, तर याच्या डिझाइनमध्येही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते," असे ते म्हणाले.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट
या जिमखान्याने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूम आणि शौचालये उपलब्ध करून देण्यावर जिमखान्याने भर दिला आहे.
ऐतिहासिक जिमखाना
१९०९ मध्ये 'न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब' म्हणून याची स्थापना झाली. अनेक वेळा स्थलांतर आणि नामकरणानंतर ते शिवाजी पार्क जिमखाना म्हणून ओळखले जाऊ लागले. १९३१ मध्ये सध्याच्या क्लबहाऊसचे उद्घाटन झाले. १९४२ पर्यंत जिमखान्याचे क्षेत्रफळ १९,००० चौरस यार्डपर्यंत वाढले.