Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: शिवसेना एकच आहे अन् राहणार; धनुष्यबाण आपलाच; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 19:07 IST

तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असं म्हणत शिवसैनिकांनी जोमानं काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबई/पुणे- मातोश्री निवासस्थानी शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी आपली शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार, असं सांगत धनुष्यबाण आपलाच आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. विरोधकांना शिवसेना फोडायची नाही, संपवायची आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 

तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असं म्हणत शिवसैनिकांनी जोमानं काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांना दिली. आतापर्यंत ज्यांना देता येणं शक्य होते, तेवढं दिलं. मात्र त्यांनी शेवटी गुण दाखवले. आता मात्र तुम्हाला देता येण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कोसळली आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं आहे. शिंदे गटातील आमदार आता उघडपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करू लागले आहेत. एकनाथ शिंदेंचे अत्यंत जवळचे समर्थक असलेले आणि पक्षाचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी घणाघाती टीका केली आहे. "बाळासाहेबांची मातोश्री आणि उद्धव ठाकरेंची मातोश्री यात खूप फरक आहे. बाळासाहेबांची मातोश्री तीन माळ्यांची होती. पण उद्धव ठाकरेंची मातोश्री आठ माळ्यांची झाली आहे. आठ मजले आम्ही चढूच शकत नाही", असा टोला भरत गोगावले यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंची मातोश्री आता ८ माळ्यांची!

मातोश्रीचे दरवाजे उघडले तर जाऊ असं शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय राठोड म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तो निर्णय घेऊ. पण मातोश्री हे ठिकाण बाळासाहेबांचं आहे. त्यांनीच ते उभं केलं आहे. उद्धव साहेबांनी नवीन मातोश्री उभी केली. बाळासाहेबांची मातोश्री तीन माळ्यांची होती. उद्धव साहेबांची ही मातोश्री ८ माळ्यांची आहे. आम्ही चढू शकत नाही. आम्ही तीनच माळे चढू शकतो, अशा शब्दांत भरत गोगावले यांनी टीका केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना