Join us  

'वेळ अन् काळ सांगा, आम्ही नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो'; आता भाजपाचं शिवसेनेला चॅलेंज

By मुकेश चव्हाण | Published: November 05, 2020 4:42 PM

भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी वैभव नाईक यांनी दिलेलं चँलेंज स्वीकरलं आहे.

मुंबई/ कणकवली: भाजपाचे नेते नारायण राणे शिवसेनेला नेहमी आव्हान देतात आणि त्यानंतर स्वतःच बाजूला होतात. 2019च्या निवडणुकीतही नारायण राणेंनी असेच केले होते. परंतु 2024च्या निवडणूकीत नारायण राणेंनी उभे राहून दाखवावे, असं आव्हान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना दिले होते. तसेच नारायण राणेंना माहितच असेलच गेल्या निवडणूकीत त्यांचा छोटा मुलगा आमदार नितेश राणे पक्ष बदलून भाजपामधून उभे राहिले नसते, तर तेही पराभूत झाले असते, असा दावा देखील वैभव नाईक यांनी केला होता. वैभव नाईक यांच्या या दाव्यानंतर आता भाजपाचे देखील प्रत्युत्तर दिले आहे. 

भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी वैभव नाईक यांनी दिलेलं चँलेंज स्वीकरलं आहे. वेळ आणि काळ सांगा, आम्ही भाजपा आमदार नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो, असं राजन तेली यांनी सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकीची वाट न पाहता वैभव नाईकांसह आमदार दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनीही तात्काळ राजीनामा द्यावा. 2024च्या निवडणुकीची वाट न पाहता त्यांनी वेळ सांगावी. चारही निवडणुका पुन्हा होऊ देत, मग बघू सिंधुदुर्गची जनता कोणाला हद्दपार करते, असं राजन तेली यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे-

महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे. तसेच शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे हाच आमचा योजनाबद्ध कार्यक्रम असल्याची माहिती नारायण राणेंनी दिली होती. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 11 आमदार निवडून येणार नाहीत. सर्वांना घरी बसवणार असल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता.

वैभव नाईकांच चँलेंज-

नारायण राणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे. या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, नारायण राणेंनी शिवसेना संपविण्याची जेव्हा जेव्हा भाषा केली त्यानंतर शिवसेना आजवर पहिल्या पेक्षा दुप्पटिने वाढली आहे.

शिवसेनेचा आता मुख्यमंत्री देखील आहे. राणेंनी दिलेले आव्हान शिवसेनेने 2014 सालीच मोडून काढले आहे. 2014 मध्ये राणेंचा पराभव माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाने केला. त्याचबरोबर त्यांच्या मोठ्या मुलाचा देखील सलग 2 वेळा शिवसेनेने पराभव केला, असं वैभव नाईक यांनी सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकीत राणेंनी उभे राहून दाखवावे.  तसे झाले तर कोकणातून शिवसेनेचे 11 आमदार येतात की 21 ते त्यांना त्यावेळी कळेल, असं वैभव नाईक यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :नीतेश राणे वैभव नाईक भाजपाशिवसेनानारायण राणे उद्धव ठाकरे